गावातील लाईट बंद आणि बिबट्याने डाव साधला,

26 महिन्याच्या बाळाला नेले उचलून
सातारा /विशेष प्रतिनिधी
नाळेवाडी गावात घडलेल्या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे. गावातील लाईट बंद होती. आणि जय संदीप खंडागळे हा अंगणात खेळत होता. संधी साधून 26 महिन्याच्या बाळाला बिबट्याने उचलून उसाच्या शेतात नेले. गावकऱ्यांनी आरडाओरडा केला. बिबट्या तान्हुल्याला सोडून पळून गेला.पण जय मात्र देवाघरी गेला. या घटनेने खंडागळे कुटुंब दहशतीत आहे. वन विभागावर गावकरी नाराज आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नाळेवाडी परिसरात गेल्या 3 महिन्यांपासून बिबट्याचा वावर होता. संध्याकाळी वीजपुरवठा खंडित झालेला असताना लहानगा जय घराबाहेर खेळत होता. अंधाराचा फायदा घेऊन बिबट्याने अचानक त्याच्यावर हल्ला केला आणि त्याला उचलून उसाच्या शेताच्या दिशेने 500 मीटर ओढत नेले. ग्रामस्थांनी आरडाओरडा करत बिबट्याचा पाठलाग केला. लोकांच्या गोंधळामुळे बिबट्याने बालकाला सोडले अन् पळ काढला, मात्र गंभीर जखमी झाल्यामुळे डॉक्टरांनी जयला रुग्णालयात मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी मृत जयला श्रद्धांजली अर्पण करत पीडित खंडागळे कुटुंबाला शासनाकडून तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी केली. तसेच डोंगराळ भागातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि वन्यप्राणी दिसल्यास तात्काळ प्रशासनाला कळवावे, असे आवाहन त्यांनी केले. सातारा तालुका पंचायत समिती सदस्य राजेश पवार यांनीही घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सध्या नाळेवाडी परिसरात बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी होत आहे.




