क्राइम
कुर्ला हादरले…..सहा महिन्यांपूर्वी मोठ्या भावाची तर आता लहान भावाची हत्या

मुंबई / क्राईम रिपोर्टर
कुर्ला परिसरात एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ माजली असून दहशत पसरली आहे. धक्कादायक म्हणजे, ज्या तरुणाची गोळीबार करून हत्या करण्यात आली होती. आधीच्या त्याच्याच भावाची सहा महिन्यांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
कुर्ला परिसरातील माकडवाला कम्पाउंड परिसरात ही घटना घडली. या भागामध्ये पवार कुटुंबीय राहतं. पवार कुटुंबांमध्ये दोन गट असून त्यांच्यामध्ये मागील काही वर्षांपासून वाद सुरू आहे. याच वादातून आता विनोद पवार याची हत्या झाली आहे. विनोद हा कुर्ला पश्चिम भागात असलेल्या शौचालयाजवळ उभा होता, त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या २ तरुणांनी भरदिवसा विनोद पवार याच्यावर बेछुट गोळीबार केला. या गोळीबारामध्ये २ गोळ्या लागल्यानंतर विनोद हा जागेवरच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला.
सहा महिन्यांपूर्वी भावाची हत्या
दरम्यान, सहा महिन्यांपूर्वीच १ मे २०२६ रोजी विनोदचा भाऊ बाबा पवार याची हत्या करण्यात आली होती. तीन जणांनी मिळून बाबा पवार नावाच्या व्यक्ती आधी गोळ्या झाडून आणि नंतर चाकूने वार करून हत्या केली होती. रात्री १० वाजेच्या सुमारास विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाइपलाइन ब्लॉक नंबर 3 इथं ही घटना घडली होती. तीन जणांनी बाबा पवार याच्यावर हल्ला केला होता. एकाने गोळ्या झाडली तर दोघांनी चाकूने सपासप वार करून बाबा पवारची निर्घृणपणे हत्या केली. या प्रकरणी शुभम घाडगे, दिनेश पवार आणि अभिजीत जाधव असे तीन आरोपी होते. बाबा पवार हा लोकांना व्याजाने पैसे द्यायचा. त्याने आरोपीच्या आईला व्याजाने पैसे दिले होते. या महिलेसोबत बाबा पवार याचे प्रेमसंबंध होते, अशीही माहिती समोर आली. यातून वाद झाला होता. याच वादातून महिलेच्या मुलाने दोन जणांना सोबत घेऊन बाबा पवारची हत्या केली.
आता विनोद पवारची हत्या
६ महिने उलटत नाही तेच बाबा पवारचा भाऊ विनोद पवार याची हत्या झाल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली , अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. विनोद पवार याचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा पुढचा तपास पोलीस करत आहेत.




