‘ बुलाती है मगर जाने का नही ‘
आग्रा पोलिसांनी लोकांना लुबाडणाऱ्या दोन तरुणींना केली अटक
आग्रा / नवप्रहार डेस्क
त्या दोघी घरातून नटूनथटून निघत.रिक्षात बसून त्या आपल्या विशिष्ट हावभावाने लोकांना आकर्षित करत. दोन तरुणी आणि त्यांचे हातवारे पाहून कोणीही त्यांच्याकडे आकर्षित होत. आणि रिक्षात बसत. काही अंतर गेल्यावर या त्या प्रवाश्याला लुटून त्याला रिक्षातून खाली फेकून देत. महत्वाचे असे की या दोघी कधीच मोबाईल बाळगत नसत. त्यांना त्यांच्या कटात शामिल रिक्षा चालकास बोलवायचे असल्यास त्या प्रवाशाच्या मोबाईल वरून त्याला कॉल लावत असत. शहरात लुटमारीच्या घटना वाढल्या नंतर पोलिसांनी सापळा रचत या दोघींना अटक केली आहे. तर कटात सहभागी असलेल्या रिक्षा चालकाला देखील अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे पोलिसांनी दोन चलाख बहिणींना लुटमारीच्या आरोपाखाली अटक केली आहे. या दोघी एका रिक्षात बसून निघत असत. रस्त्यात एखादा पुरुष प्रवासी दिसला तर त्या त्याला रिक्षात बसायला सांगत. मग संधी साधत या महिला पुरुषाला लुटत आणि रिक्षातून ढकलून देत असत. या कृत्यात रिक्षाचालक देखील सामील होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला देखील अटक केली आहे. सध्या या प्रकरणात पोलिसांनी एकूण तिघांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. त्यांच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
ताजगंज पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली. अनेक दिवसांपासून पोलिसांना या बहिणींविषयी तक्रारी मिळत होत्या. त्यानुसार तपास केला असता, या चलाख बहिणी एका रिक्षा चालकाच्या मदतीने लूटमार करत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी या तिघांना अटक केली. चौकशीदरम्यान, सुरुवातीला या तिघांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. नंतर गुन्हा कबूल केला.
या दोन्ही बहिणी शाहगंज पोलीस स्टेशन हद्दीतील रहिवासी आहेत. आरोपी बहिणींनी सांगितलं की, “ ‘बंटी और बबली’ हा हिंदी चित्रपट पाहून आम्ही लूटमार करू लागलो. आम्ही सावज हेरण्यासाठी घरातून मेकअप करून निघायचो. मोबाईल घरी ठेवायचो. रस्त्यात प्रवाशांकडून मोबाईल घेऊन साथीदार असलेल्या रिक्षा चालकाला बोलवायचो. मग त्याच्या रिक्षात बसून शहरात फिरायचो. रस्त्यात एखादा प्रवासी रिक्षात बसला तर त्याला आम्ही मधल्या सीटवर बसवायचो. मग संधी मिळताच प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची साखळी आणि त्याचा मोबाईल फोन चोरायचो.“ काही वेळा या महिला पुरुषांना आपल्या सौंदर्याच्या जाळ्यात ओढून त्याला लुटायच्या. या कामासाठी त्या रिक्षाचालकाला चार ते पाच हजार रुपये द्यायच्या. `आम्ही सामान्यपणे एकटा पुरुष प्रवासी हेरायचो. कारण अशा पुरुषाला लुटणं सोपं असायचं,` असं त्यांनी सांगितलं. सध्या पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.