दुहेरी खून प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचे अपहरण करून केला गेम

शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक
सांगली / विशेष प्रतिनिधी
दुहेरी खून प्रकरणातील मुख्य आरोपीचे अपहरण करून त्याला कर्नाटक मध्ये नेत त्याची हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या हत्येला आत्महत्या दर्शविण्यासाठी मृतदेह झाडाला लटकवून आत्महत्या दर्शविण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांपुढे त्यांची ही हुशारी फार काळ तग धरू शकली नाही. पोलिसांनी या प्रकरणी वेगाने तपास करत शिवसेना पदाधिकाऱ्यासह तिघांना अटक केली. १२ तासांच्या आत आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
याबाबत मिळालेली माहिती जत तालुक्यातील कोसारी दुहेरी खून प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराचे अपहरण करून त्याचा निघृण खून करण्यात आलाय. या प्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आलीय. ज्ञानू अण्णाप्पा खोत (वय २५, कोगनोळी), रोहित बाळासाहेब पाटोळे (वय २५, करोली टी.), शिवसेनेचा पदाधिकारी हर्षद दाजी पैलवान (वय ३०, तासगाव/कवठेमहांकाळ) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. तर सुयश ऊर्फ स्वप्नील किसन खुळे (मंगळवेढा) आणि अमर खताळ (इचलकरंजी) हे संशयित फरार असून त्पयांचा शोध घेतला जात आहे.
जत तालुक्यात कोसारी इथं दादासो नामदेव यमगर (वय ५०) हे एका जुन्या दुहेरी खून प्रकरणात मुख्य साक्षीदार होते. मंगळवारी सकाळी नागज फाटा येथून एका पांढऱ्या रंगाच्या चारचाकी गाडीतून आलेल्यांनी त्यांच अपहरण केलं होतं. त्यानंतर दादासो यमगर यांना कर्नाटकातील अथणीजवळील मदभावी (निलनगे वस्ती) इथं शेतात नेत हत्या केली. तसंच ही हत्या नसून आत्महत्या आहे असा बनाव रचण्यासाठी मृतदेह झाडाला गळफास लावलेल्या स्थितीत लटकवला.
कवठेमहांकाळ पोलिसांना याबाबत गुप्त माहिती मिळताच याचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी वेगानं तपास करत संशयितांना ताब्यात घेतलंय. साक्षीदारावर दबाव आणण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी ही हत्या केली असल्याची माहिती सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी दिलीय.




