शेती विषयक

वन्यप्राण्यांचा पिकांवर धुडगूस; अऱ्हाडच्या शेतकऱ्याचे नुकसान! 

Spread the love

 

अऱ्हाड-कुऱ्हाड, उदखेडमध्ये सिंगल फेजचा अभाव; दिवसा १२ तास वीजपुरवठ्याची शेतकऱ्यांची मागणी

अंजनगाव बारी : प्रतिनिधी ( पवन इंगोले)

अऱ्हाड परिसरात वन्यप्राण्यांकडून शेतपिकांची नासधूस होत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत. आधीच दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असताना तूर व कपाशी पिकांच्या नुकसानीने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या नुकसानीची तातडीने पाहणी करून पंचनामा करावा आणि नियमानुसार भरपाई मंजूर करावी, अशी मागणी अऱ्हाड येथील शेतकरी किरण प्रकाश पोकळे यांनी वनविभागाकडे केली आहे.
किरण पोकळे यांची अऱ्हाड येथे दोन एकर शेती असून, त्यांनी यंदा तूर व कपाशीची लागवड केली आहे. मात्र, वन्यप्राण्यांच्या उपद्रवामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे त्यांनी ८ ऑक्टोबर २०२६ रोजी सादर केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रादेशिक), वडाळी, अमरावती यांच्याकडे ऑनलाइन अर्जाद्वारे तक्रार दाखल करून तातडीने पंचनामा व नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे.

*• सिंगल फेजअभावी शेतकऱ्यांची कोंडी!*

अऱ्हाड-कुऱ्हाड आणि उदखेड या गावांमध्ये सिंगल फेज वीजपुरवठा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परिसरातील इतर गावांमध्ये सिंगल फेज वीजपुरवठा सुरू असताना या तीन गावांतील शेतकरी मात्र या सुविधेपासून वंचित असल्याची तक्रार आहे. रात्रीच्या वेळी शेतात जाऊन पिकांचे संरक्षण करणे कठीण होत असून, वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

*• कनिष्ठ अभियंत्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे!*

अंजनगाव बारी येथील वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ अभियंत्यांनी या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन अऱ्हाड-कुऱ्हाड आणि उदखेड या गावांतील शेतकऱ्यांना दिवसा १२ तास सिंगल फेज वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी होत आहे. इतर गावांमध्ये वीजपुरवठ्याची सुविधा असताना या गावांतील शेतकऱ्यांना त्यापासून वंचित का ठेवले जात आहे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष परिस्थितीची दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

*• नुकसानभरपाईसाठी वनविभागाकडे धाव*

किरण प्रकाश पोकळे यांनी वन्यप्राण्यांमुळे झालेल्या पीक नुकसानीबाबत अर्ज दाखल केला असून, त्याची प्रत जिल्हाधिकारी, तहसीलदार, कृषी अधिकारी, अमरावती तसेच तलाठी, पार्डी (देवी) यांना पाठविण्यात आली आहे. शेताची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करावा आणि शासनाच्या नियमानुसार भरपाई मंजूर करावी, अशी त्यांची मागणी आहे.
एकीकडे वन्यप्राण्यांचा उपद्रव, तर दुसरीकडे सिंगल फेज वीजपुरवठ्याचा अभाव; अशा दुहेरी संकटात सापडलेल्या अऱ्हाड-कुऱ्हाड व उदखेडच्या शेतकऱ्यांना आता संबंधित विभागांकडून ठोस दिलासा मिळणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

[ “अऱ्हाड-कुऱ्हाड व उदखेड येथे ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे काम सुरू असून, त्यासाठी वेळ लागणार आहे. या प्रश्नावर वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा सुरू आहे.”
— अंकुश सोनवणे, कनिष्ठ अभियंता, अंजनगाव बारी ]
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close