रेल्वे स्थानक परिसरात तरुणीवर पाच जणांकडून सामूहिक बलात्कार

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कौतुकास्पद कारवाई
वर्धा /विशेष प्रतिनिधी
मुळची उमरेड तालुक्यातील सोनेगाव (बेला) येथील रहिवाशी 19 वर्षीय तरुणी चंद्रपूर येथील आपल्या काकांकडे गेली होती. परत घरी जाण्यासाठी निघालेल्या तरुणीवर वर्धा येथील स्टेशन वर पोहचताच एका संशयिताने तिला गाठले.आपल्या ऑटोत बसवले.दरम्यान त्याने आपल्या चार साथीदारांना बोलावून घेत तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. वर्धा लोहमार्ग पोलिसांना याबद्दल समजताच त्यांनी घटनेचे गांभीर्य जाणून तात्काळ पावले उचलत 13 संशयितांना ताब्यात घेतले. तरुणीसमोर उभे केले असता त्याने त्यातील पाच लोकांना लगेच ओळखले. पोलिसांनी त्या पाच आरोपींवर बीएनएस नुसार गुन्हे दाखल करून अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे तात्काळ कारवाई करत आरोपींना अटक करणाऱ्या लोहमार्ग पोलिसांचे कौतुक होत आहे.
तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी परिसरातील 12 ते 13 संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. पीडित तरुणीने त्यापैकी 5 मुख्य आरोपींची अचूक ओळख पटवली आहे.नागपूर लोहमार्ग पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या ओळखीनंतर पाचही आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 70(1) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्धा लोहमार्ग पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.




