गोळी झाडून हत्या प्रकरणात आरोपींचा पोलिसांनी लावला छडा

शिरूर ( पुणे ) / विशेष प्रतिनिधी
आपल्या मित्रासोबत मोपेड वरून जातांना दबा धरून बसलेल्या तीन लोकांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेल्या आणि त्यानंतर फरार झालेल्या आरोपींना पोलिसांनी ४८ तासात अटक केली आहे. हरीश गंगावणे असे मृत तरुणाचे नाव आहे.
यात घटनेत आरोपीनं अगदी जवळून हरीशच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. यात हरीशचा जागीच मृत्यू झाला. हा गुन्हा घडल्यानंतर तिन्ही आरोपी फरार झाले होते. मात्र अवघ्या ४८ तासांत पोलिसांनी या खूनाचा छडा लावला आहे. घटनेचं गांभीर्य ओळखून वेगाने चक्रे फिरवत शिरूर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांच्या आत या गुन्ह्यातील तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
लाटे आळी परिसरातील थरार
मिळालेल्या माहितीनुसार, १८ सप्टेंबर रोजी शिरूर येथील लाटे आळी परिसरात हरीश दादाभाऊ गंगावणे (वय ३४) या तरुणावर अज्ञात इसमांनी अचानक गोळीबार केला होता. या प्राणघातक हल्ल्यात हरीश गंगावणे यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. भल्या पहाटे घडलेल्या या थरारक घटनेमुळे संपूर्ण शिरूर शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली होती.
सुपा टोलनाका परिसरातून आरोपी जेरबंद
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तपासाची सुत्रे वेगाने हलवली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला. पोलीस पथकाने सुपा टोलनाका परिसरात सापळा रचून तीन संशयितांना ताब्यात घेतले. रोहित रविंद्र सोनवणे, अनिकेत विलास गव्हाणे आणि आदित्य दादाभाऊ पवार अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
आरोपींचा गुन्हेगारी पार्श्वभूमी
अटक करण्यात आलेल्या या तिन्ही आरोपींवर यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या हत्येमागील मुख्य कारण काय होतं? याचा सखोल तपास सध्या पोलीस उपनिरीक्षक नितीन केनेकर करत आहेत. पोलिसांच्या या जलद कामगिरीचे नागरिक कौतुक करत आहेत.




