बालपणीची मैत्रीण निघाली सख्खी बहीण

डीएनए रिपोर्ट समजताच दोघांना आश्चर्याचा धक्का, अश्रू अनावर
नेदरलँड / नवप्रहार डेस्क
बालपणी भेटलेली मुलगी जी आपली मैत्रीण झाली ती सख्खी बहिण असू शकते असा कोणी स्वप्नातही विचार करणार नाही. पण हे घडलं आहे.आणि ते ही याच धरतीवर.ही कुठल्या चित्रपटाचे स्टोरी नव्हे तर प्रत्यक्षात घडलेली घटना आहे. चला तर पाहू या नक्की काय प्रकार आहे.
आपण ज्या घटनेबद्दल जाणून. घेणार आहोत त्यात दोन मुली एका कार्यक्रमात भेटतात.त्यात त्यांची मैत्री होते.आणि भविष्यात त्यांना जे समजते ते एकूण दोघींनाही आश्चर्याचा धक्का बसतो.आणि अश्रू अनावर होतात. या दोघींची डीएनए चाचणी केली असता एक अशी माहिती त्यांना मिळाली, जी मागील ३० वर्षांपासून त्यांना माहिती नव्हती. यानंतर दोघींचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. कारण यातून या दोघी सख्ख्या बहिणी असल्याचं उघड झालं होतं!
रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मीना गेल्टिंक आणि मिनल तिसेन या दोघींनाही सुमारे ४० वर्षांपूर्वी भारतातील एका अनाथाश्रमात सोडण्यात आलं होतं. नेदरलँड्समधील वेगवेगळ्या कुटुंबांनी त्यांना दत्तक घेतलं होतं. एकाच देशात सुमारे १०० मैल (१६० किमी) अंतरावर त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पण आपल्या जवळच आपली बहीण राहत आहे याची दोघींना पुसटशीही कल्पनाही नव्हती. वृत्तानुसार, या दोघींची पहिली भेट १९९६ मध्ये दत्तक घेतलेल्या मुलांसाठी आयोजित एका कार्यक्रमात झाली होती. त्यांना तेव्हाच एकमेकींशी एक विशेष जवळीक जाणवली आणि त्या दिसायला किती सारख्या आहेत, हे त्यांच्या मित्र-मैत्रिणींच्याही लक्षात आले.
दोघीही एका चांगल्या आणि प्रेमळ दत्तक कुटुंबांमध्ये वाढल्या असल्या, तरी आपल्या मूळ ओळखीबाबत त्यांच्या मनात काही प्रश्न आणि काहीतरी अपूर्ण असल्याची भावना होती. डीएनए रिपोर्ट आल्यानंतर जेव्हा त्या नेदरलँड्समध्ये एकमेकींना भेटल्या, तेव्हा दोन्ही बहिणींनी एकमेकीला घट्ट मिठी मारली. त्या मनमोकळेपणाने हसल्या आणि भावुक होऊन रडल्याही. तसेच, बहिणी म्हणून त्यांनी आपला पहिला ‘सेल्फी’ही काढला. ”जेव्हा मी तुला पाहते, तेव्हा मला अगदी घरी असल्यासारखे वाटते. अनेक वर्षे माझ्या मनात एक पोकळी होती. जणू काही कोडे सोडवतानाचा एखादा हरवलेला तुकडा सापडला आहे, असे मला वाटते,” असे मीना म्हणाली. ”बहिणी म्हणून ओळख होण्याआधी आम्ही मैत्रिणी होतो. आम्ही तशा सुरुवातीपासूनच बहिणी होतो; पण आम्हालाच त्याची कल्पना नव्हती,” मीनलने सांगितले.


