अवघे आठ दिवसावर लग्न असलेल्या तरुणीचा अपघातात मृत्यू

नियतीने कोणाच्या पुढ्यात काय लिहून ठेवले आहे हे कोणालाच माहीत नसते. अगदी हसत खेळत असलेला व्यक्ती धाडकन जमिनीवर पडतो आणि गतप्राण होतो. अवघ्या आठ दिवसावर लग्न असलेली तरुणी सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला गेली. परतीच्या प्रवासात कार चा टायर फुटून झालेल्या अपघातात तरुणी आणि तिच्या चुलत वहिनीचा मृत्यू झाला आहे. तर दोन भावंड गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही हृदयद्रावक घटना पाचोरा तालुक्यातील महादेवाचे बांबरुड येथे घडली.
शिखा विनायक बेलसरे आणि मीना मानकर अशी मृत्यू झालेल्या नवरी आणि चुलत वहिनींची नावे आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, शिखाचा 21 एप्रिल रोजी साखरपुडा झाला होता. तर 8 मे रोजी लग्न होणार होते. लग्नाची पत्रिका वणी येथील सप्तशृंगी देवीच्या गडावर ठेवून आशीर्वाद घेण्यासाठी ती भाऊ शुभम बेलसरे आणि चुलत भाऊ सुनील मानकर, चुलत वहिनी यांच्यासोबत परतवाडा (जि. अमरावती) येथून स्विफ्ट डिझायर कारने गेली होती. गडावर देवीची पूजा करून ओटी भरली, वडिलांना फोनवरून दर्शन झाल्याची माहिती दिली… आणि परतीच्या प्रवासातच नियतीने घात केला.
टायर अचानक फुटल्याने कार झाडावर आदळली
परत येताना महादेवाचे बांबरुड गावाजवळ कारचे टायर अचानक फुटल्याने वाहन अनियंत्रित झाले आणि झाडावर आदळले. या भीषण अपघातात शिखा बेलसरे व मीना मानकर यांचा मृत्यू झाला. तर शुभम बेलसरे आणि सुनील मानकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. लग्नकार्य अवघ्या काही दिवसांवर असताना, असा अपघाती मृत्यू झाल्यानं संपूर्ण कुटुंबात हळहळ व्यक्त केली जात आहे.


