भावी पत्नीला भेटण्यासाठी बोलवले पण त्याआधीच त्याला मृत्यूने गाठले

खोलीत पोलिसांना शक्तिवर्धक गोळ्या आणि हेल्थ सप्लिमेंट आढळून आले
गुरुग्राम / विशेष प्रतिनिधी
दिल्ली येथील क्वॉलिटी कौन्सिल ऑफ इंडिया या कंपनीत असलेल्या आणि हरियाणाच्या गुरुग्राम येथे कर्तव्यावर असलेल्या व मूळचा नागपूर येथील रहिवासी असलेल्या रोहित नावाच्या २९ वर्षीय तरुणाचा मृतदेह त्याच्या खोलीत आढळून आला आहे.रोहितचे नुकतेच लग्न ठरल्याचे सांगितले जाते. मात्र त्याचा मृतदेह भाड्याच्या घरात आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली. पोलिसांना त्याच्या खोलीतून काही औषधे आणि हेल्थ सप्लिमेंट्स आढळून आल्या आहेत.
प्रकरण काय आहे?
गुरुवारी सकाळी या घटनेचा खुलासा झाला. रोहितचे कार्यालयातील मित्र एकत्रच रोज कार्यालयात जात होते. मात्र गुरुवारी मित्र रोहितला घ्यायला त्याच्या घराच्या खाली आले असता रोहित आलाच नाही. त्यामुळे मित्राने त्याच्या घरात जाऊन आवाज द्यायचा विचार केला. घराजवळ गेल्यानंतर दार ठोठावूनही आतून काहीच प्रतिसाद आला नाही. दरवाजा आतून बंद होता. तसेच रोहित फोनही उचलत नव्हता, त्यामुळे मित्रांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी येऊन दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेव्हा रोहित मृतावस्थेत आढळून आला.
पोलिसांना रोहितच्या खोलीत हेल्थ सप्लिमेंट आणि इतर औषधे आढळून आली. पोलिसांमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहितने आपल्या भावी पत्नीला भेटण्यासाठी बोलवले होते. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांना संशय आहे की, रोहितने लैंगिक शक्तीवर्धक गोळ्या घेतल्या होत्या. या औषधाची मात्रा अधिक झाल्यामुळे हृदयविकाराचा धक्का येऊन त्याचा मृत्यू झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. सेक्टर ५३ च्या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतेंद्र रावल म्हणाले की, आम्ही व्हिसेरा नमुने आणि खोलीत मिळालेल्या औषधांचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवून दिले आहेत.
अंतिम अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समजू शकेल. मात्र तरीही या घटनेशी संबंधित प्रत्येक पैलूची तपासणी केली जात आहे, असेही सूत्रांनी सांगितले. रोहितच्या एका मित्राने सांगितले की, त्याचा नुकताच साखरपुडा झाला होता आणि बुधवारी त्याने आपल्या भावी पत्नीला घरी बोलावले होते.
शक्तीवर्धक गोळ्या घेताना डॉक्टरांचा सल्ला घ्या
लैंगिक शक्ती वाढविण्यासाठी आजकाल शक्तीवर्धक किंवा लैंगिक क्षमता वाढविणारी औषधे घेण्याकडे अनेकांचा कल दिसतो. सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून होणारी याबाबतच्या जाहिरातबाजीला काहीजण बळी पडतात. विशेषकरून तरुणाईमध्ये असे औषधे घेण्याचे प्रमाण अधिक आहे.
लैंगिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. निधी झा यांनी एनडीटीव्हीशी संवाद साधत असताना लैंगिक क्षमता वाढविणारी औषधे नेमके काय करतात, याबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, अशी औषधे शरीरातील रक्तपुरवठ्याला प्रभावित करतात. वीर्यपतनशी निगडित समस्या असतील तर अशी औषधे उपयोगी ठरतात. मात्र यातून लैंगिक क्षमता वाढते, असा एक गैरसमज झाला आहे.




