राष्ट्रीय
लेन्स कार्ट ला टिकली आणि टिळक वाद नडला

शेअर बाजारात घसरतोय लेन्स कार्ट चा शेअर
प्रसिद्ध आयवेअर बँड ‘लेन्सकार्ट’ सध्या एका मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकला असून त्याचे पडसाद आता शेअर बाजारातही उमटू लागले आहेत. दुकानातील कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या ‘ड्रेस कोड’मध्ये टिकली, टिळक लावण्यावर निर्बंध घातल्याच्या आरोपावरून सोशल मीडियावर कंपनीला तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. या वादाचा परिणाम म्हणून सोमवारी लेन्सकार्टच्या शेअरमध्ये सुमारे ५ टक्क्यांची मोठी घसरण पाहायला मिळाली.
नेमका वाद काय?
सोशल मीडियावर लेन्सकार्टच्या ‘स्टाईल गाईड’मधील एका पानाचा फोटो व्हायरल झाला आहे. या नियमावलीनुसार, कंपनीने कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी बिंदी (टिकली), टिळक किंवा हातात धार्मिक दोरा बांधण्यास मनाई केल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, याच नियमावलीत ‘हिजाब’ला परवानगी दिल्याचे दिसून आल्याने नेटकऱ्यांनी कंपनीवर ‘धार्मिक भेदभावाचा’ आरोप केला आहे. यामुळे सोशल मीडियावर बायकॉट लेन्सकार्ट हा ट्रेंड जोरदार सुरू झाला आहे.
संस्थापक पीयूष बन्सल यांचे स्पष्टीकरण
वाढता रोष आणि शेअर बाजारातील घसरण पाहून लेन्सकार्टचे संस्थापक आणि सीईओ पीयूष बन्सल यांनी तात्काळ स्पष्टीकरण दिले होते. त्यांनी म्हटले की, “व्हायरल होत असलेला दस्तऐवज जुना आणि कालबाह्य झालेला आहे.
लेन्सकार्टच्या सध्याच्या धोरणात धार्मिक अभिव्यक्तीवर कोणतेही निर्बंध नाहीत. कर्मचारी बिंदी आणि टिळक अभिमानाने लावू शकतात. आमच्याकडून झालेल्या या चुकीबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो.”
शेअर बाजारात ‘लेन्सकार्ट’ची स्थिती
१० नोव्हेंबर २०२५ रोजी लेन्सकार्टचा आयपीओ ४०२ रूपये किमतीला आला होता. मात्र, तो ३९० रूपयांवर (३% सवलतीत) सूचीबद्ध झाला. गुरुवारी हा शेअर ५३४ रूपयांवर व्यवहार करत होता. मात्र सोमवारच्या ड्रेस कोड वादाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांनी सावध पवित्रा घेतल्याने शेअरमध्ये ५ टक्क्यांची घसरण झाली. सोशल मीडियावरील बहिष्काराच्या आव्हानाचा परिणाम कंपनीच्या विक्रीवर आणि ब्रँड व्हॅल्यूवर होईल, या भीतीने गुंतवणूकदारांनी नफावसुलीला प्राधान्य दिले आहे.
बाजार तज्ज्ञांचे मत
तज्ज्ञांच्या मते, ग्राहक कंपन्यांसाठी ‘ब्रँड इमेज’ अत्यंत महत्त्वाची असते. कोणत्याही स्टार्टअपसाठी धार्मिक किंवा सामाजिक वादात अडकणे हे व्यावसायिकदृष्ट्या घातक ठरू शकते. पीयूष बन्सल यांनी वेळीच माफी मागितली असली, तरी ग्राहकांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी कंपनीला कठोर पावले उचलावी लागतील
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1




