सामाजिक

अंजनगाव बारीत बालविवाह निर्मूलनासाठी जनजागृती रॅली उत्साहात!

Spread the love

• चार शाळांतील विद्यार्थ्यांचा सहभाग; पथनाट्य, घोषणांद्वारे बालविवाह रोखण्याचा संदेश

अंजनगाव बारी : प्रतिनिधी ( पवन इंगोले)

आंतरराष्ट्रीय बालविवाह निर्मूलन दिनानिमित्त २७ नोव्हेंबर रोजी अंजनगाव बारी येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. महिला व बालविकास विभाग आणि जस्ट राइट्स फॉर चिल्ड्रेन प्रकल्पांतर्गत अस्मिता इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद कन्या शाळा, जिल्हा परिषद मुलांची शाळा, जिल्हा परिषद उर्दू शाळा आणि जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.
जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय डबले यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अस्मिता फाउंडेशनच्या अध्यक्षा संगीता गायकवाड, जिल्हा समन्वयक अ‍ॅड. अभिता वासनिक, सामाजिक कार्यकर्त्या गायत्री घोगरे, तिलोत्तमा वानखडे, ग्रामविकास अधिकारी विनोद इसळ, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी ‘मला शिकू द्या, मोठे होऊ द्या’, ‘मुलगी शिकली, प्रगती झाली’ अशा घोषणांतून बालविवाह निर्मूलनाचा संदेश दिला. विद्यार्थ्यांच्या हातातील जनजागृतीपर पोस्टर्सने ग्रामस्थांचे लक्ष वेधले. जिल्हा परिषद कन्या शाळेतील विद्यार्थिनींनी बालविवाहाच्या दुष्परिणामांवर आधारित पथनाट्य सादर केले. मुख्य चौक व ग्रामपंचायत चौकात पथनाट्याद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.
रॅलीचा समारोप जनता विद्यालयात झाला. यावेळी चाइल्ड हेल्पलाइनच्या जिल्हा समुपदेशक मीरा राजगिरे यांनी उपस्थितांना बालविवाहमुक्त समाज निर्माण करण्याची शपथ दिली. मनीष खानपासोळे व भूषण सर यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा परिषद कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका विजया झाडे यांनी केली. रॅलीच्या यशस्वितेसाठी शाळेतील शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हा परिषद मुलांची शाळा मुख्याध्यापिका संध्या राठोड, ऊर्दू शाळा मुख्याध्यापक मो. युसुफ अजहर, सहाय्यक शिक्षक किशोर मालोकार यांनी विद्यार्थिनींकडून पथनाट्याची तयारी करून घेतली, तर रामेश्वर स्वर्गीय, संगीता मंडे व रेशमा वांगे यांनी घोषणांचा सराव करून घेतला. वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close