या कारणाने विद्यार्थ्यांनी शिक्षकाला फेकून मारल्या चपला
रायपूर / नवप्रहार मीडिया
देशातील भावी पिढी घडवण्याचे कार्य आणि जबाबदारी ही शिक्षकांची असते. पण आता ते पूर्वीसारखे शिक्षकच राहिले नाहीत.तसा सगळाच दोष हा शिक्षकांचा नसतो. आपले भविष्य घडविण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांची सुध्दा असते. पण शिक्षकच जर वाम मार्गाला लागला असेल तर मग त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष ? अशीच एक घटना छत्तीसगड राज्यात घडली आहे. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे प्रकरण .
सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या धुमाकूळ घालत आहे.यात एक इसम दुचाकीवर बसला आहे आणि विद्यार्थी त्याच्या मागे चपला घेऊन धावत आहेत..हा व्हिडिओ छत्तीसगडच्या बस्तरमधील एका प्राथमिक शाळेतला आहे. माहितीनुसार, व्हिडिओ आठवड्यापूर्वीचा आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षक दारु पिऊन शाळेत आला होता. तो नेहमीच मद्याच्या अमलाखाली असतो. शाळेत आलेला शिक्षक शिकवण्याचे काम सोडून विद्यार्थ्यांना त्रास देत होता. शिक्षकाच्या या वागणुकीला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी त्याला अद्दल घडवण्याचा निर्णय घेतला. काही विद्यार्थ्यांनी शिक्षकाला चप्पलांचा मारा करुन पिटाळून लावले आहे.
व्हिडिओमध्ये दिसतंय की, विद्यार्थ्यांनी चप्पलांचा मारा सुरु केल्यानंतर शिक्षक पळून जाण्याचा प्रयत्न करतो. तो आपल्या टूव्हिलरवर गडबडीत बसतो आणि तेथून धूम ठोकतो. मात्र, विद्यार्थी त्याच्या मागे लागतात आणि चप्पल त्याच्या दिशेने फेकतात. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संपाताची लाट उसळली आहे. असे शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिक्षण देणार, उलट त्यांनाच शिक्षणाची गरज आहे अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
नेहमी येतो दारु पिऊन
स्थानिकांच्या माहितीनुसार, शिक्षक नेहमी दारु पिऊन शाळेत येतो. शाळेत आल्यानंतर तो विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या भानगडीत पडत नाही. उलट, शाळेमध्ये सतरंजी टाकून निवांत झोपी जातो. विद्यार्थी शिक्षकाकडे शिकवण्याची विनंती करतात, पण तो काही ऐकत नाही. याच प्रकाराला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांनी बंडाचा झेंडा फडकावला. त्यांनी शिक्षकाला शाळेतूनच हाकलून लावले. एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट केला आणि व्हायरल केला.
गेल्या काही दिवसांमध्ये अशाच प्रकारचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. शिक्षक शाळेमध्ये दारु पिऊन येत आहेत.अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी लोकांमधून होत आहे. कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत असे दारुडे शिक्षक सुधारणार नाहीत अशी लोकांची भावना आहे.




