दारूचे व्यसन असलेल्या मूकबधिर मुलाची आईवडिलांनीच केली हत्या

चार किमी लांब शेतात नेऊन जाळला मृतदेह
तेराव्याच्या विधीवरून गुन्हा आला उघडकीस
नगर / प्रतिनिधी
दारूच्या व्यसनावरून मूकबधिर मुलासोबत झालेल्या वादातून आई वडिलांनी मुलाला दांडक्याने मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात न नेता घरीच ठेवले. त्यामुळे योग्य उपचार न मिळाल्याने दोन दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला. आई वडिलांनी चार किमी लांब असलेल्या शेतात नेऊन मृतदेह जाळला. तेराव्याच्या विधीवरून गुन्हा आला उघडकीस
दारूच्या व्यसनावरून झालेल्या वादात आई-वडिलांनी मुलाला दांडक्याने मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता घरातच ठेवण्यात आले. दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह पहाटे शेतात नेऊन जाळण्यात आला.
ही घटना गुणवडी (ता. अहिल्यानगर) शिवारात ४ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. प्रवीण प्रकाश लांडगे (वय २५) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्याचे वडील प्रकाश विनायक लांडगे व आई आशा प्रकाश लांडगे यांना ताब्यात घेतले आहे. प्रवीण मूकबधिर असून त्याला दारूचे व्यसन होते. त्यावरून त्याचे आई-वडिलांशी वारंवार वाद होत होते.
काही दिवसांपूर्वी दारूच्या नशेत घरी आल्यानंतर झालेल्या वादात वडिलांनी त्याला दांडक्याने मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला. दोन दिवसांनी त्याचा मृत्यू झाला. मृत्यूची माहिती लपवून आई-वडिलांनी पहाटे मृतदेह घरापासून सुमारे चार किलोमीटर अंतरावरील स्वतःच्या शेतात नेऊन जाळला. तेथे मानवी अवशेष व हाडे आढळून आली. माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली.
प्राथमिक तपासानंतर मृतदेह प्रवीणचा असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आई-वडिलांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. त्यांनी खुनाची कबुली दिल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश वारुळे यांनी सांगितले. अपर पोलिस अधीक्षक वैभव कलुबर्मे व नगर ग्रामीणचे उपअधीक्षक शिरीष वमने यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.
तेराव्याच्या नैवेद्यामुळे गुन्हा उघडकीस
नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिस आरोपी लांडगे यांच्या घरी चौकशीसाठी आले. घरात मात्र तेराव्या विधीसाठी बनवतात तसा स्वयंपाक केला होता. स्वयंपाकघराचीही पाहणी करण्यात आली. मृतदेह सापडला त्याच दिवशी तेराव्याचा विधी घातल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांचा आरोपींबाबतचा संशय बळावला. पाच वर्षांपूर्वी आरोपींनी मुलाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून खून करण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात निष्पन्न झाले.




