एअर होस्टेस मृत्यू प्रकरणात महिला मास्टरमाईंड

सलग चार दिवस तपासले 250 ते 300 सीसीटीव्ही कॅमेरे
पुणे /क्राईम रिपोर्टर
विदर्भाला हादरून सोडणाऱ्या एअर होस्टेस वर्षा धुर्नलाल तुरकर हिच्या मारेकऱ्यांना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले आहे. सलग चार दिवस 250 ते 300 CCTV फुटेज तपासल्यावर पोलिसांना मारेकऱ्यांचा सुगावा लागला आणि पोलिसांनी मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळल्या.
गोंदियाचे पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी या संपूर्ण गुन्ह्याचा उलगडा केला.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार,हा थरार 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 ते 6 वाजेच्या सुमारास घडला. तिरोडा तालुक्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोंडराणी जंगल परिसरात वर्षा तुरकर यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवली.
या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलिसांची 6 विशेष पथके तयार करण्यात आली होती. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या वर्णनानुसार पोलिसांनी गोंदिया आणि शेजारील बालाघाट जिल्ह्यात शोधमोहीम राबवली. तिरोडा, खैरलांजी, वारासिवनी ते गोंदिया या मार्गावरील सुमारे 250 ते 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज सलग 4 दिवस तपासण्यात आले. एका कॅमेऱ्यात हल्लेखोराचा चेहरा स्पष्ट दिसल्याने तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी प्रथम इम्रान करीम शेख याला ताब्यात घेतले.
इम्रानच्या कसून चौकशीत शाहरूख पठाणने सुपारी दिल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी शाहरूख, कुणाल कुंभलकर आणि कट रचणारी मोना अग्रवाल अशा चौघांना अटक केली आहे. या गुन्ह्यातील इतर 2 आरोपी अद्याप फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.




