महिला मित्राकडून इन्स्टावर मैत्री भेटीसाठी बोलावून हत्या

बेळगाव /विशेष प्रतिनिधी
जून्या वादाचा बदला घेण्यासाठी तरुणाने षडयंत्र रचून महिला मित्राला त्याच्याशी इन्स्टाग्रामवर मैत्री करायला लावली. त्यानंतर त्याला भेटीसाठी बोलावून मित्राच्या मदतीने त्याची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींना अटक केली आहे.तर या प्रकरणातील महिला आरोपी फरार आहे.
शशि जलगडकर याने मित्राच्या प्रेयसीला इंस्टाग्रामवर मैत्री करायला लावली. मैत्री केल्यानंतर भेटीगाठी वाढवून संबंधित तरुणाला निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे आरोपींनी त्याचे अपहरण करून धारदार शस्त्रांनी हत्या केल्याचा आरोप आहे. सर्वेश कांगरालाकर असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.
वर्षभरापूर्वी चाकूहल्ला; मनात होता सूड
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे एक वर्षापूर्वी जमिनीवर शेड बांधण्याच्या वादातून सर्वेशने मुख्य आरोपी शशि जलगडकर याच्यावर चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात शशि गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर बरा झाल्यानंतर त्याने सर्वेशच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी सर्वेशला संपवण्याचे नियोजन करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे.
इंस्टाग्रामवरून मैत्री; हॉटेल-पार्कमध्ये भेटी
सर्वेशला जाळ्यात ओढण्यासाठी शशिने आपल्या एका मित्राच्या गर्लफ्रेंडची मदत घेतल्याचा आरोप आहे. संबंधित तरुणीला सर्वेशशी इंस्टाग्रामवर मैत्री करण्यास सांगण्यात आले. दोघांमध्ये संवाद वाढल्यानंतर त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांकही घेतले. सर्वेशचा त्या तरुणीवर विश्वास बसल्यानंतर दोघांच्या हॉटेल आणि पार्कमध्ये भेटीगाठी सुरू झाल्या.
गणेशोत्सवाच्या बहाण्याने खानपूरला नेले
दरम्यान, २० सप्टेंबर रोजी आरोपी महिलेने गणेशोत्सव आणि फिरण्याच्या बहाण्याने सर्वेशला खानपूरच्या दिशेने नेल्याचा आरोप आहे. दोघेही एका निर्जन ठिकाणी पोहोचल्यानंतर त्यांचा पाठलाग करणाऱ्या आरोपींनी सर्वेशला अडवले. त्यानंतर त्याचे अपहरण करून धारदार शस्त्रांनी त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
हत्या केल्यानंतर मृतदेह नदीपात्रात फेकला
हत्येनंतर सर्वेशचा मृतदेह लपवण्यासाठी आरोपींनी तो खानपूर येथील मालप्रभा नदीच्या पात्रात फेकून दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर सर्व आरोपी आणि संबंधित महिला तेथून निघून गेले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नियोजनपूर्वक हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
रात्री घरी न परतल्याने वडिलांची तक्रार
घटनेच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत सर्वेश घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या वडिलांनी माल मारुती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला. कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवण्यात आली.
चार आरोपी अटकेत; महिला आरोपी फरार
तांत्रिक तपासातून पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेत अटक केली. शशि जलगडकर (३३), राहुल जलगडकर (३०), दशरथ राजपूत (२३) आणि अरुण हुलोली (२२) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सर्वेशला कथितपणे प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याला निर्जनस्थळी घेऊन जाणारी महिला सध्या फरार असून, पोलीस तिचा शोध घेत आहेत. दरम्यान, या हत्येमागील नेमके नियोजन, सर्व आरोपींची भूमिका, हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे तसेच फरार महिला आरोपीचा सहभाग याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.




