अपघात
चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस पलटली

सुदैवाने जीवितहानी टळली
वाशिम / विशेष प्रतिनिधी
दुचाकी स्वार अचानक बस समोर आल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्नात चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने बस पलटी झाल्याची घटना वाशिम – पुसद रोड वर घडली आहे.
या घटनेत सुदैवाने कुणालाही फार मोठी गंभीर दुखापत झालेली नाही. पण या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटना घडली तेव्हा एसटी बसमध्ये तब्बल 37 प्रवासी होते. या 37 प्रवाशांपैकी काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती आहे.
वाशिम जिल्ह्यातील वाशिम–पुसद मार्गावरील सापळी फाटा येथे आज शेगाव ते उमरखेड जाणारी बस पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली. या बसमध्ये एकूण 37 प्रवासी प्रवास करत होते. मिळालेल्या माहितीनुसार, एम एच 14 बीटी 4362 क्रमांकाची बस वाशिम बसस्थानकातून निघाल्यानंतर उमरखेडकडे जात असताना एका बाईक चालकाने अचानक बससमोर बाईक आडवी आणल्याने बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. नियंत्रण सुटल्यामुळे बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली.
काळ आला होता पण वेळ नाही
ही घटना अतिशय धक्कादायक होती. एसटी बस थेट पलटी झाली होती. त्यामुळे बसमधील 37 प्रवाशांचा जीव धोक्यात आला होता. ही बस चालकाच्या नियंत्रणाच्या बाहेर गेली होती. त्यामुळे काहीही अप्रिय घटना घडण्याची शक्यता होती. एसटी थेट पलटी झाली. घटना घडल्यानंतर स्थानिकांनी तातडीने बचावकार्यासाठी धाव घेतली. तसेच प्रशासनानेदेखील घटनास्थळी महत्त्वाची भूमिका निभावली. प्रशासन आणि स्थानिकांच्या मदतीने सर्व 37 प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर अनेकांच्या मनात काळ आला होता पण वेळ नाही, अशी भावना आली


