क्राइम

तो अपघात नव्हे तर घातपात, पूर्वनियोजित कट आखून केली तरुणाची हत्या 

Spread the love

भोकरदन / विशेष प्रतिनिधी 

                    मोटारसायकल धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाल्याने वडिलांनी हा अपघात नसून माझ्या मुलाला मारण्याचा पूर्वनियोजित कट होता असा आरोप करत पोलिसात तक्रार नोंदवली आहे. मृतक २६ वर्षीय तरुण शुभम का शेतात झोपण्यासाठी पायी निघाला होता. दरम्यान एका दुचाकी ने त्याला रस्त्यात धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला होता. 

भोकरदन तालुक्यातील वाकडी येथील शुभम येडुबा वाघ (वय २६) या तरुणाच्या मृत्यू प्रकरणी त्याचे वडील येडुबा राजाराम वाघ यांनी दिलेल्या जबाबावरून पत्नीसह तिघांविरुद्ध भोकरदन पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

 

लग्नानंतर कौटुंबिक वाद आणि न्यायालयात दावा वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शुभम शेतीकाम पाहत होता. २७ नोव्हेंबर २०२४ रोजी त्याचा विवाह पुनम उर्फ छकुली बाळू तौर हिच्यासोबत झाला होता. विवाहाच्या काही महिन्यांनंतर त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरू झाले. पुनम हिने शुभमच्या वैवाहिक क्षमतेवर संशय घेतल्याने त्याच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात आवश्यक तपासण्या व उपचारही करण्यात आले होते. दरम्यान, १५ एप्रिल २०२५ रोजी पुनम माहेरी निघून गेली. तिला पुन्हा नांदायला आणण्यासाठी शुभमने जालना कौटुंबिक न्यायालयात कायदेशीर दावा दाखल केला होता. याच दरम्यान, पुनम हिचे वाकडी येथील रहिवासी रवी महादू चिंचपुरे याच्याशी फोनवर बोलणे सुरू असल्याचा संशय कुटुंबीयांना आला.

“दावा मागे घे, नाहीतर जीवे मारीन”; मंदिराजवळ धमकीचा आरोप येडुबा वाघ यांनी जबाबात नमूद केल्यानुसार, ४ जुलै रोजी रवी चिंचपुरे याने शुभमला गावातील गणपती मंदिराजवळ अडवले. पुनमला नांदायला आणण्यासाठी न्यायालयात दाखल केलेला दावा तातडीने मागे घे, अशी तंबी दिली. जर दावा मागे घेतला नाही तर थेट जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिल्याचे शुभमने घरी येऊन कुटुंबीयांना सांगितले होते. या घटनेनंतर अवघ्या तीन दिवसांतच शुभमचा संशयास्पद मृत्यू झाला.

रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळला; रुग्णालयात मृत घोषित ७ जुलै रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास शुभम जेवण आटोपून नेहमीप्रमाणे भोकरदन रस्त्यावरील शेतात राखणीसाठी झोपायला निघाला. रात्री आठच्या सुमारास गावाचे पोलीस पाटील भाऊसाहेब सिरसाठ यांनी फोन करून शुभम रस्त्यावर गंभीर जखमी अवस्थेत पडल्याची माहिती दिली. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली असता, शुभमच्या डोक्याच्या मागील बाजूस खोल जखम होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला होता. तसेच डाव्या पायाच्या घोट्याला व अंगठ्याला जखमा होत्या. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, सोपान संजय जाधव याच्या ताब्यातील मोटारसायकलने शुभमला धडक दिल्याचे सांगण्यात आले. गंभीर अवस्थेत त्याला तातडीने भोकरदन येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

 

अपघाताचा बनाव रचून काटा काढल्याचा वडिलांचा दावा वडिलांनी पोलिसांत दिलेल्या जबाबात अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मुलाची पत्नी पुनम उर्फ छकुली वाघ, तिचा कथित मित्र रवी महादू चिंचपुरे आणि मोटारसायकल चालक सोपान संजय जाधव या तिघांनी संगनमत करून हा कट रचल्याचा थेट आरोप त्यांनी केला आहे. शुभम त्यांच्या मार्गातील अडथळा ठरत असल्याने त्याचा काटा काढण्यासाठीच मुद्दाम दुचाकीने जोरदार धडक देऊन हत्येला अपघाताचे रूप देण्यात आले, असा दावा वडिलांनी केला आहे. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला असून, वडिलांच्या जबाबातील आरोपांची सत्यता पडताळून पोलीस तांत्रिक व वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे तपास करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close