NEET परीक्षा पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपीच्या भावा बाबत धक्कादायक खुलासे

वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या NEET युजी परीक्षेचा पेपर फुटला. त्यामुळे ३. मे रोजी झालेली ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. तब्बल २२ लाख विद्यार्थी यात भरडले जात आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी शुभम खैरनार याला नाशिक मधून अटक करण्यात आली आहे. शुभमच्या भावाबद्दल एक धक्कादायक माहिती समोर येत आहे.
शुभमच्या भावाकडे गावठी पिस्तूल
शुभम खैरनारचा भाऊ भावेश याच्याकडे गावठी पिस्तूल आढळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे खैरनार कुटुंबाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
भावेशकडे हे पिस्तूल कशासाठी होते? त्याचा वापर कोणत्या कारणासाठी केला जात होता? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
कोण आहे शुभम खैरनार?
शुभम खैरनार हा नाशिकच्या इंदिरानगर परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहत होता. त्याचे मूळ गाव नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात आहे.
मंगळवारी दुपारी मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी त्याने केस कापून आपला चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जुन्या छायाचित्रांची तुलना आणि तांत्रिक तपासाच्या मदतीने पोलिसांनी त्याची ओळख पटवली.
१० लाखांत प्रश्नपत्रिका खरेदी, १५ लाखांत विक्री
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शुभम खैरनारने पुण्यातील एका संशयिताकडून १० लाख रुपयांत प्रश्नपत्रिका विकत घेतली होती. त्यानंतर ती हरियाणातील एका व्यक्तीला १५ लाख रुपयांना विकून ५ लाख रुपयांचा नफा कमावल्याचा आरोप आहे. हा संपूर्ण व्यवहार एनक्रिप्टेड मेसेंजर ॲपद्वारे करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली आहे.
मोबाईलऐवजी स्कॅनरचा वापर
पोलिस तपासात असेही समोर आले की, आरोपींनी प्रश्नपत्रिका मोबाईलने स्कॅन केली नव्हती. पकड टाळण्यासाठी त्यांनी हाय-डेफिनिशन पोर्टेबल स्कॅनरचा वापर केला होता.
स्कॅन केलेल्या प्रती नंतर टेलिग्राम आणि व्हॉट्सॲपसारख्या सोशल मीडिया ॲप्सवरून शेअर करण्यात आल्या.
देशभरात पसरलेले रॅकेट
तपासकर्त्यांच्या मते, या प्रकरणामागे मोठे देशव्यापी नेटवर्क कार्यरत होते. मनीष यादव हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे, तर राकेश मांडवारिया याच्यावर प्रश्नपत्रिका वितरित केल्याचा आरोप आहे.
राजस्थान एसओजीने या दोघांसह आतापर्यंत १५ जणांना अटक केली आहे. मनीष यादवला जयपूरमधून ताब्यात घेण्यात आले.
‘प्रायव्हेट माफिया’ व्हॉट्सॲप ग्रुपचा खुलासा
तपासादरम्यान पोलिसांना ‘प्रायव्हेट माफिया’ नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप आढळला. या ग्रुपमध्ये कथित प्रश्नपत्रिका मोठ्या प्रमाणावर शेअर होत होती.
या प्रश्नपत्रिकेसाठी ५ हजार ते ३० हजार रुपये घेतले जात होते. काही विद्यार्थ्यांनी पैसे देऊन प्रश्नपत्रिका घेतली, तर काहींनी ती इतरांना मोफत पुढे पाठवली असल्याची माहिती समोर आली आहे.
१५० पैकी १२० प्रश्न जुळल्याचा दावा
सूत्रांच्या माहितीनुसार, हस्तलिखित अंदाजपत्रिकेतील १५० पैकी तब्बल १२० प्रश्न मूळ जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र प्रश्नपत्रिकेशी जुळले होते.
या अंदाजपत्रिकेमध्ये एकूण ४१० प्रश्न आणि त्यांची उत्तरे होती. ही प्रश्नपत्रिका कोचिंग क्लासेस आणि विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलपर्यंत पोहोचल्याचा आरोप आहे.
नाशिकहून हरियाणापर्यंत प्रश्नपत्रिकेचा पुरवठा
तपासात असेही समोर आले की, नाशिकहून प्रश्नपत्रिकेची हार्ड कॉपी हरियाणाला पाठवण्यात आली होती. तिथे तिच्या प्रती तयार करून पुढे वितरित करण्यात आल्या. राजस्थानमधील सीकर येथील काही कोचिंग सेंटरमध्ये परीक्षा होण्याच्या महिनाभर आधीपासून हे साहित्य उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे.



