क्राइम
सुरक्षारक्षक व्यवस्थापकाकडून महिलेसोबत नको ते….

महिलेची तक्रार ,अधिकारी आरोपीला पाठीशी घालत असल्याचा महिलेचा आरोप
मुंबई / विशेष प्रतिनिधी
कायदे कितीही कडक केले तरी महिलांवरील अत्याचारारात कुठलीच कमी दिसून येत नाही. मुंबई मेट्रोत एक अशीच घटना महिलेच्या तक्रारीनंतर उघडकीस आली आहे. येथील चारकोप डेपोमध्ये एका वरिष्ठ अधिकाऱ्याने कनिष्ठ महिला अभियंत्याचा विनयभंग केला आहे. मेट्रोमध्ये कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सुरक्षा व्यवस्थापकाने हा गैरप्रकार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी चारकोप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संबंधित अधिकाऱ्याला पाठीशी घातले जात असल्याचा गंभीर आरोप पीडितेनं केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४६ वर्षीय पीडित महिला अभियंता विरार येथील रहिवासी असून त्या महामुंबई मेट्रो संचालन मर्यादित कंपनीच्या चारकोप डेपोमध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत. त्या एका खासगी संस्थेमार्फत कंत्राटी पद्धतीने कामाला होत्या. मेट्रोमध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळावी, यासाठी त्या प्रयत्नशील होत्या. याच बाबीचा फायदा घेत सुरक्षा व्यवस्थापकानं तिचा विनयभंग केला आहे.
मार्च २०२५ मध्ये जेव्हा ही महिला मस्टर मंजुरीच्या कामासाठी गेली असता, आरोपी सुरक्षा व्यवस्थापकाने तिला गाठले. “तुझं सरकारी नोकरीचं काम मीच करून देऊ शकतो,” असे सांगून त्याने कार्यालयातच या महिलेशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली आणि तिचा विनयभंग केला. या प्रसंगातून स्वत:ची सुटका करून घेतल्यानंतर पीडित महिलेने हिंमत दाखवत कंपनीच्या अंतर्गत तक्रार समितीकडे आणि राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली.
मात्र, तक्रार केल्याचा राग धरून तिला तातडीने कामावरून काढून टाकण्यात आलं. अखेर महिला आयोगाने या प्रकरणात हस्तक्षेप केल्यानंतर तिला पुन्हा कामावर रुजू करून घेण्यात आलं. आता या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर नुकताच चारकोप पोलीस ठाण्यात संबंधित सुरक्षा व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, इतके दिवस उलटूनही आरोपीवर कठोर कारवाई होत नसल्याने पीडितेने संताप व्यक्त केला आहे. “संबंधित अधिकारी सरकारी पदावर असल्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा खळबळजनक आरोप पीडित महिलेने केला आहे. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.




