क्राइम

पतीच्या प्रेयसीला अडकवण्यासाठी चुलतीने केली पुतण्याची हत्या

Spread the love
पोलिसांपुढे ती फार काळ तग धरू शकली नाही 
चाकुर (लातूर ) विशेष प्रतिनिधी 
               पतीच्या अनैतिक संबंधाला कंटाळलेल्या आणि पतीच्या प्रेयसीला खुना सारख्या गंभीर गुन्ह्यात अडकवून तिला तुरूंगवारी घडविण्याच्या नादात महिलेने स्वतःच्या पुतण्याला संपविल्याची दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना उघड झाली आहे. महिलेने पोलिसांची दिशाभूल करण्याचा भरपूर प्रयत्न केला पण पोलिसांपुढे ती जास्त वेळ तग धरू शकली नाही. घटना लातूर जिल्ह्यातील चाकुर येथे घडली आहे.

अनैतिक संबंधातून सूडाचा प्रवास

आरोपी महिलेच्या पतीचे दुसऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते, त्यावरून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत असत. पतीच्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी आणि तिला कायदेशीर कचाट्यात अडकवण्यासाठी आरोपीने स्वतःसह दिराच्या मुलांचे अपहरण झाल्याचा बनाव रचला. याच रागातून तिने आपल्या सात वर्षीय पुतण्याचा खून केला आणि तो आरोप पतीच्या प्रेयसीवर लावून तिला अडकवण्याचा कट रचला. गुन्हा लपविण्याच्या उद्देशाने तिने पुतण्याचा मृतदेह एका पडक्या वाड्यात टाकून दिला, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदे

खेळायला गेलेली मुले परतलीच नाहीत

रविवारी (१९ एप्रिल) चाकूर येथील साईचरण दिनेश स्वामी (वय १०) व देवांश मंगेश स्वामी (वय ७) हे दोन सख्खे चुलत भाऊ सकाळी ७ वाजेच्या सुमारास घरातून खेळण्यासाठी बाहेर गेले होते. मात्र, बराच वेळ झाला तरी ते घरी परतले नाहीत. यामुळे फिर्यादी मंगेश चंद्रकांत स्वामी यांनी पोलिसांना मुले बेपत्ता असल्याची माहिती दिली. यावरून पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी संयुक्तपणे शोध सुरू केला. दुपारी १:३० वाजेच्या सुमारास महादेव मंदिराजवळील उजळंब रोड परिसरातील एका पडक्या जागेत, ट्रॅक्टरच्या टायरच्या आडोशाला देवांश स्वामी याचा मृतदेह आढळून आला.

तपासाचा छडा

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या. अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि चाकूर पोलीस ठाण्याच्या पथकांनी वेगाने तपास सुरू केला. यावेळी फिर्यादीची वहिनी अनिता दिनेश स्वामी हिचे वर्तन पोलिसांना संशयास्पद वाटले.

घटनेनंतर तिचा मोबाईल बंद असणे, साधारण दोन-अडीच तास ती घराबाहेर असणे आणि चौकशीदरम्यान विसंगत माहिती देणे, यामुळे पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी तांत्रिक आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा करून विचारपूस केली असता तिने गुन्हा कबूल केला.

पाच दिवसांची पोलीस कोठडी

याप्रकरणी पोलिसांनी अनिता स्वामी हिला अटक करून न्यायालयात हजर केले असता, तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्यात तिला आणखी कोणी सहकार्य केले आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत. या हत्याकांडात आणखी काही आरोपी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या कारवाईत पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर, स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close