सामाजिक

हळदीची सुरू होती धामधूम वधूला आला चक्कर अन्….

Spread the love
नाशिक /विशेष प्रतिनिधी 
                एखाद्या लहानशा बाबीकडे दुर्लक्ष करणे किती भयंकर होऊ शकते याची प्रचिती गोडबोले कुटुंबाला आलीं आहे. गोडबोले कुटुंबातील तरुणी दीपशिखा हिचे लग्न ठरले होते. कुटुंबीय आणि नातेवाईक लग्नासाठी रिसॉर्ट मध्ये आले होते. हळदीची धामधूम सुरू असतानाच दीपशिखाला अवस्थ वाटू लागले.तिला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरनी तिला मृत घोषित केले. 

नाशिक शहरात रविवारी सकाळी हा प्रकार घडला. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दीपशीखा गिरीश गोडबोले असे २९ वर्षीय मयत वधूचे नाव आहे. त्या मुंबईतील दादर-माटुंगा परिसरातील रुपारेल कॉलेजजवळ राहत होत्या.

नेमकं काय घडलं?

दीपशीखा यांचा विवाह गंगापूर गावापासून जवळच एका आलिशान रिसॉर्टमध्ये होणार होता. यासाठी वऱ्हाड मुंबईहून दाखल झाले होते. मात्र हॉटेलमधील खोली क्रमांक २०१ मध्ये नातेवाईकांसोबत असताना सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास दीपशीखा चक्कर येऊन पडल्या.

दीपशीखा यांच्या आत्या डॉ. स्वाती बापट यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना श्रीगुरूजी रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारांसाठी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यास सांगण्यात आले. तेथे डॉ. गांगुर्डे यांनी दीपशिखा यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
लग्नाचा मंडप सजलेला असतानाच बोहल्यावर चढण्यापूर्वी वधूचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दीपशिखा यांच्या हाताला मेहंदी सजली, संगीत सोहळाही पार पडला, मात्र ऐन लग्नाच्या तोंडावर त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कशामुळे मृत्यू झाला?

लग्नमुहूर्तासाठी तयार होत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती आहे. मात्र आदल्या रात्रीचे जागरण, लग्नाची दगदग यामुळे प्रकृती वरखाली होत असल्याचा समज करुन त्यांनी दुर्लक्ष केले होते. परंतु साडेनऊ वाजताच्या सुमारास दीपशीखा चक्कर येऊन पडल्या आणि गोंधळ उडाला.

कुटुंबावर शोककळा

जिच्या डोक्यावर अक्षता टाकण्याचं स्वप्न पाहत होतो, तिला अशाप्रकारे अखेरचा निरोप द्यावा लागत असल्याने नातेवाईक हवालदिल झाले. गोडबोले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुंबईतील गोडबोले कुटुंब राहत असलेल्या परिसरावरही शोककळा पसरली असून दीपशिखा यांचे मित्र, सहकारी, नातलग यांना अश्रू अनावर झाले आहेत.

त्याच रिसॉर्टमध्ये वधूपित्याचा मृत्यू

दुर्दैवी योगायोग म्हणजे नाशिकमधील याच रिसॉर्टमध्ये जेमतेम एक आठवड्यापूर्वी वधूपित्याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close