आय फोन च्या हट्टापायी अख्ख कुटुंब संपलं…..


आय फोन च्या हट्टापायी अख्ख कुटुंब संपलं…..
छत्रपती संभाजीनगर / विशेष प्रतिनिधी
GEN Z यांना महागडे फोन, कपडे, गॉगल्स, घड्याळ यांचा छंद जडला आहे. एखाद्या मित्राजवळ चांगला मोबाईल दिसला की आपल्या कडे देखील तसाच किंवा त्याच्या तोडीचा मोबाईल असावा असे त्याला वाटते. त्यासाठी आपल्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काय आहे ? याचा देखील तो विचार करत नाही. आयफोन 15 च्या हट्टापायी अख्ख कुटुंब संपल्याची दुर्दैवी घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये वाळूज MIDC परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर घडली आहे.
मृतांमध्ये 19 वर्षीय कुणाल चांदगुडे, त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे (48) आणि आई संगीता चांदगुडे यांचा समावेश आहे.
डोंगरावर जाऊन जीवन संपवण्यामागचं धक्कादायक कारण समोर-
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मोबाईल फोन घेण्यावरून कुणालचा आई-वडिलांशी वाद झाला होता. कुणाला आयफोन हवा होता. Apple कंपनीच्या आयफोन 15 मोबाईलसाठी हट्टाला पेटलेला मुलगा जीव देण्यासाठी खवड्या डोंगरावर पोहोचला. मागाहून गेलेले आई-वडील त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला आहे.
नेमकं काय घडलं?
कुणालचा वडिलांसोबत वाद झाला होता. त्यानंतर तो सकाळी सुमारे 10 वाजता खवड्या डोंगरावर गेला. त्याचा हेतू टोकाचं पाऊल उचलण्याचा असल्याचं समोर आल्यानंतर आई-वडील त्याला समजावण्यासाठी डोंगरावर पोहोचले. कुणालला समजावण्याचे प्रयत्न सुमारे तीन तास सुरू होते. पोलिस, स्थानिक नागरिक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीही त्याला खाली आणण्याचा प्रयत्न केला. त्याला वाचवण्यासाठी खाली जाळी लावण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र कुणाल वारंवार आपली जागा बदलत होता. अखेर कुणालने डोंगरावरून उडी घेतली. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात वडील मुरलीधर यांचाही तोल गेला आणि ते खाली कोसळले. त्यानंतर मुलगा आणि पती खाली पडल्याचे पाहून आई संगीता यांचाही दुर्दैवी अंत झाला. तिघांचाही डोंगराच्या खाली पडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. तिघांचे मृतदेह बाहेर काढून पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
सरपंच म्हणाला, ‘आयफोन 15 प्रो देतो’-
कुणाल चांदवडे हा डोंगराच्या कड्यावर जवळपास तीन तास उभा होता. तो वारंवार जागा बदलत होता. यादरम्यान, कुणालचे आई-वडील आणि तिसगावच्या ग्रामस्थांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ‘तू जीव देऊन काय होणार आहे, आईकडे बघून तरी जग’, असे ग्रामस्थांनी त्याला सांगितले. तिसगावचे सरपंचही याठिकाणी उपस्थित होते. त्यांनी कुणालकडे पाहून म्हटले, ‘ हे बघ मी सरपंच आहे गावचा, मोबाईल आहे माझ्याजवळ. तुला आयफोन 15 प्रो देऊ’, असे त्यांनी म्हटले. त्यावर कुणाल हताशपणे गुडघ्यात वाकला आणि नंतर म्हणाल की, ‘आता काहीच सोल्यूशन नाही, एकच सोल्यूशन आहे’. त्यावर कुणालच्या आईने, ‘दुसरं सोल्यूशन नाही, असं का वाटतं तुला’, असे रडवेल्या आवाजात म्हटले. यानंतर काहीवेळातच वडील जवळ आल्यानंतर कुणालने डोंगराच्या कड्यावरुन शरीर खाली झोकून दिले आणि त्याच्यासोबत वडील आणि त्याच्यापाठोपाठ आई असे तिघेही खाली पडून त्यांचा मृत्यू झाला.

