क्राइम

फुलप्रूप प्लान आखत डॉन ला संपवले

Spread the love

एकेकाळचा मित्रच बनला वैरी

सुरत /विशेष प्रतिनिधी 

सुरत शहरातील भेस्तान हा भाग कापड आणि हिरा उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. या परिसरात  रिअल इस्टेट आणि इतर अवैध व्यवसायावर वर्चस्व असणाऱ्या डॉन ला त्याच्याच एकेकाळच्या मित्राने संपवले. एखाद्या चित्रपटाच्या कथानकाला शोभेल असे या हत्याकांडाची स्टोरी आहे. सतीश उर्फ मराठा असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.तर राहुल मंडल उर्फ राहुल अपार्टमेंट अवे हत्या करणाऱ्याचे नाव आहे. सतीश मराठा याचे लोकेशन मिळविण्यासाठी मंडल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी त्याच्या कार मध्ये जीपीएस लावले होते. तर राहुल मंडल याने तुरुंगात असताना देखील मारेकऱ्यांना पैशे पुरवल्याचा आणि हत्येचे सूत्र हलविल्याचा आरोप आहे.


या प्रकरणी पोलिसांनी जेलमध्ये असलेल्या राहुल मंडलचा ताबा घेतला आहे. त्याला कोर्टात हजर केलं असता कोर्टाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सतीश मराठाला मारण्यासाठी आरोपींनी सात दिवसांपूर्वीच ट्रॅप लावला होता. यासाठी त्याच्या कारमध्ये जीपीएस ट्रॅकर लावला होता. सात दिवसांपासून सतीश मराठा कुठे जातो? कुणाला भेटतो? यावर हल्लेखोर बारीक लक्ष ठेवत होते.

सतीश मराठा याच्या हत्येच्या सुमारे सात दिवसांपूर्वी त्याच्या कारच्या ड्रायव्हर सीटजवळ एक जीपीएस (GPS) ट्रॅकर बसवण्यात आल्याचं भेस्तान पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, “सतीशच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी आणि त्याचे लाईव्ह लोकेशन मिळवण्यासाठी हे डिव्हाइस गुपचूप बसवण्यात आलं होतं.”

ट्रॅकरच्या तपासावरून पोलिसांकडून राहुल मंडलची चौकशी


हा जीपीएस ट्रॅकर कोणी खरेदी केला, तो कोणाकडून मिळवला आणि सतीशच्या कारमध्ये कोणी बसवला, याचा शोध घेण्यासाठी तपास अधिकारी आता राहुल मंडलची कसून चौकशी करत आहेत. सतीशचे लाईव्ह लोकेशन कसे मिळवले जात होते आणि ही माहिती लाजपोर जेलमध्ये असलेल्या राहुल मंडलपर्यंत कशी पोहोचवली जात होती की थेट शूटर्सना दिली जात होती, याचाही पोलीस शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं?


घटनेच्या दिवशी सतीश मराठा हा आपल्या २० वर्षीय मैत्रिणीसोबत कारने जात होता. त्याने अलठाण येथील भगवान महावीर कॉलेज परिसरातून तिला पीक अप केलं होतं. दोघंही कारने जात असताना भेस्तान भागात हल्लेखोरांनी सतीश मराठाला गाठलं आणि तब्बल ३९ वार करून त्याची हत्या केली. मैत्रिणीच्या डोळ्यांसमोर हा थरार घडवून आणला. वर्चस्वाच्या लढाईतून आणि जुन्या वैमनस्यातून हे हत्याकांड घडल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झालं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत तीन अल्पवयीन मुलांसह एकूण नऊ जणांना ताब्यात घेतलं आहे. हे सर्व आरोपी गुजरात सोडून महाराष्ट्रात पळून जाण्याच्या तयारीत असताना तापी जिल्ह्यातील सोनगड-उच्छल मुख्य रस्त्यावर पोलिसांनी त्यांना पकडलं.

जवळचा मित्रच कसा झाला दुष्मन?

सुरतचे सहाय्यक पोलीस आयुक्त (J डिव्हिजन) एस. सी. तारडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येचा मुख्य कट सुरतच्या मध्यवर्ती लाजपोर कारागृहात रचला गेला होता. कुख्यात गँगस्टर राहुल मंडळ उर्फ ‘राहुल अपार्टमेंट’ यानेच ही हत्या घडवून आणली. आपल्या साथीदारावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मंडळने तुरुंगात बसून प्लॅन आखला आणि सतीश मराठाला संपवलं, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

एकेकाळी सतीश मराठा आणि राहुल मंडळ हे एकमेकांचे अत्यंत जवळचे मित्र होते. फेब्रुवारी २०२० मध्ये वेद रोडवरील कार्यालयात झालेल्या कुख्यात डॉन ‘सूर्या मराठी’च्या बहुचर्चित हत्याकांडात हे दोघेही सह-आरोपी होते. या प्रकरणात चार वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर गेल्या वर्षी जुलैमध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. मात्र, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पांडेसरा, भेस्तान, डिंडोली, गोडादरा आणि लिंबायत भागातील अवैध दारू विक्री आणि जुगाराच्या धंद्यावर वर्चस्व मिळवण्यावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाले आणि जीवाला जीव देणारे मित्र दुष्मन झाले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close