किसान मोर्चा पोहचणार शेतकऱ्यांच्या बांधावर
– चार हजार विस्तारक कार्यकर्ते घेणार १ कोटी शेतकऱ्यांच्या भेटी
– प्रदेश बैठकीत किसान मोर्चाची घोषणा
प्रतिनिधी अमित वानखडे
मागील काळात राष्ट्रवादी काँग्रेस शेतकऱ्यांची दिशाभूल केली. आता किसान मोर्चाने राज्यभरातल्या शेतकऱ्यांच्या बांधा-बांधावर जाऊन त्यांना वस्तुस्थिती पटवून द्यावी, आमूलाग्र कृषीक्रांती घडवून आणणाऱ्या योजनांची माहिती द्यावी, असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.
गुरुवारी मुंबई येथे प्रदेश कार्यालयात झालेल्या भाजपा महाराष्ट्र किसान मोर्चाच्या बैठकीत ते मार्गदर्शन करीत होते. श्री बावनकुळे म्हणाले, केंद्राने आणि राज्याने बजेटमधून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. भाजपाच्या सरकारने सुरक्षा, विकास आणि तंत्रज्ञान यातून शेतकऱ्यांना संरक्षणकवच पुरवले. आर्थिक समृद्धीचा विचार या सरकारने केलेला आहे. आता सर्वात मोठी जबाबदारी ही किसान मोर्चाची आहे, असे आवाहन त्यांनी केले.
पूर्वी शेतकऱ्यांना रात्री वीज मिळत होती, आता सोलारसिस्टीमला जोडत शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यात आघाडी घेतली आहे. कोळशाच्या वीजेत आणि सोलारच्या वीजेच्या दरात फार मोठा फरक आहे. ९ रुपये दराची वीज आता दोन रुपये दराने मिळणार आहे. केवळ एक रुपयात विमा देत सरकारने दरवर्षी पाच हजार कोटींचा भार स्वतःच्या खांद्यावर पेलला आहे. असेही श्री बावनकुळे म्हणाले.
यावेळी किसान मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस मा.डॉ. शंभुकुमारजी, राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री बन्सीलाल गुर्जरजी, मा. रणधीर सावरकरजी, किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा.वासुदेव काळे, भाजपा प्रदेश सरचिटणीस मा.विक्रांतजी पाटील, किसान मोर्चा सरचिटणीस मा. मकरंद कोर्डे, श्री आनंदराव राऊत, श्री विलास बाबर, बिंदूशेठ शर्मा, श्री शंकर वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते.
जी-२० चा फायदा शेतकऱ्यांनाही
मोदी सरकारचे नेतृत्व जगाने मान्य केले, पण भारतातल्या विरोधकांची मुद्दाम त्यांना बदनाम करायची प्रवृत्ती आहे. आज जी-२० चे नेतृत्व भारत करत आहे, त्याचाही फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. किसान मोर्चाने आपला वॉर-रूम अद्ययावत करून या अपप्रचाराला उत्तर दिले पाहीजे असेही बावनकुळे म्हणाले.
१ कोटी १५ लाख सेल्फी काढणार
४००० शेतकरी विस्तारक कार्यकर्ते या चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेचे किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री वासुदेव नाना काळे यांनी प्रत्येक जिल्ह्यातून किमान शंभर विस्तारक कार्यकर्ते प्रवास आणि संवादाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतील. १ कोटी १५ लाख शेतकऱ्यांना भेटून त्यांना योजनांची माहिती, धन्यवाद देवेंद्रजी” पत्रलेखन आणि शेतकऱ्यांसोबत सेल्फी काढून प्रदेशाकडे पाठविणार आहेत.