अन् चक्क पोलिसाने च थाटला ड्रग्ज चा कारखाना

लातूर /. नवप्रहार ब्युरो
अल्पकाळात कोट्यधीश बनण्याची इच्छा सगळ्यांनाच असते. मग तो शासकीय नोकरदार का असेना ! त्यासाठी काही नोकरदार २ नंबरचा मार्ग देखील निवडतात. बरं ज्यांना कायद्या बद्दल माहिती नाही त्यांनी असे केले तर ती बाब वेगळी ! पण ज्याला कायद्याबद्दल पूर्ण ज्ञान आहे. इतकेच नाही तर तो स्वतः पोलिसात आहे. आणि तोच जर २नंबरचा व्यवसाय करत असेल.आणि त्यातल्या त्यात ड्रग निर्मिती करीत असेलतर त्याला काय म्हणावं ? मुंबई पोलिसात कर्मचारी असलेल्या व्यक्ती ड्रग्स चा कारखाना चालवित होता.पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यातल्या रोहिणी शिवारात जिथे पोलिसांनी धाड टाकली. तिथं तब्बल 17 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं आहे. शिवाय पाच जणांना अटक केली आहे. या कारखान्याचा म्होरक्या आहे, प्रमोद केंद्रे. बरं सर्वात धक्कादायक गोष्ट ही आहे की प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलिसांचा कर्मचारी आहे.
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा ड्रग्जचा कारखाना माळरानावर थाटला कसा गेला? प्रमोद केंद्रे हा मुंबई पोलीस दलात कार्यरत होता. त्यावेळी त्याची मुंबईतल्याच एका ड्रग्ज तस्कराशी ओळख झाली. ड्रग्ज तस्कराने केंद्रेला ड्रग्ज तयार करण्याचं प्रशिक्षण दिलं होतं. यातून अमाप पैसा मिळेल हे केंद्रेलाही समजलं. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी केंद्रेनं आपल्या गावाकडे माळरानावर शेड मारलं. शेडमध्ये ड्रग्ज निर्मितीची उपकरणे बसवली. त्यानंतर त्यातून ड्रग्ज निर्मिती सुरु केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.
ड्रग्ज निर्मिती सुरु होती. त्यातून बक्कळ पैसा मिळत होता. पण काही दिवसांपूर्वी पुणे पोलिसांनी एका ड्रग्ज पेडलरला अटक केली. त्याच ड्रग पेडलरला दांडक्याचा प्रसाद दिल्यानंतर, त्याने प्रमोद केंद्रेच्या ड्रग्जच्या कारखान्याचा पत्ता सांगितला. पोलिसांनी पाळत ठेवली. आणि अखेर प्रमोदला बेड्या पडल्या. प्रमोदसह जुबेद हसन मातकर, मोहम्मद असलम खान, अहमद कलीम शेख आणि खाजा शफिक मोमीन यांनाही अटक केली आहे.
अटक केलेल्यांना घेवून पोलिस कारमधून लातूरच्या दिशेने ते निघाले होते. लातूररोड येथील एका हॉटेलजवळ आल्यानंतर कारमध्ये पाठीमागे बसलेल्या संशयित आरोपीने अचानक चालकाला मारहाण करण्यास सुरवात केली. कारचे स्टेअरिंग वळवून पळून जाण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कारमधील पथक प्रमुखांच्या प्रसंगावधानामुळे त्यास पळून जाता आले नाही. मात्र,भरधाव वेगातील कारने एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर प्रश्न असा आहे, की ड्रग्ज बनवण्याचे कारखाने असे कोणत्याही माळरानावर उगवू लागले. त्यातून ड्रग्ज राजरोसपणे बाहेर पडू लागले. तर ड्रग्जचा हा विळखा सुटणार कसा?