अखेर थोरल्या पवारांनी मौन तोडले ; काय म्हणाले पहा
मुंबई / नवप्रहार डेस्क
विधानसभा निवडणुकीच्या निकाल हा महाविकास आघाडी साठी खरच धक्कादायक होता. त्यामुळे महाविकास आघाडी कडून लगेच प्रतिक्रिया येणे अपेक्षित नव्हते. पण निकल लागून बराच वेळ निघून गेला आहे. आज सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी मौन तोडत विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
दरम्यान शरद पवार यांना मनसेच्या कामगिरीवर प्रश्न विचारण्यात आलं असता त्यांनी टीका न करता आपल्यालाही इतक्या जागा मिळतील असं वाटलं नव्हतं असं उत्तर दिलं. राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडून आला नाही असं सांगण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यांचा एकही आला नाही आणि आमचेही फक्त 10 आले. या निवडणुकीत आम्हालाही इतक्या कमी जागा मिळतील असं त्यांनाही वाटत नव्हतं”. “आमची जी अपेक्षा होती तसा निकाल नाही. पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे. त्याचा अभ्यास करणं, कारणीमांसा करणं याची गरज आहे. नव्या उत्साहाने लोकांमध्ये जाऊन उभं राहावं लागेल,” असंही शरद पवार म्हणाले आहेत.
‘अजित पवार आणि युगेंद्र पवारांची तुलना होऊ शकत नाही’
“बारामतीत कोणीतरी उभं राहायला हवं होतं. जर उमेदवार दिला नसता तर महाराष्ट्रात काय संदेश गेला असता. कोणीतरी निवडणूक लढण्याची गरज होती. अजित पवार आणि युगेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नाही याची आम्हाला कल्पना होती. अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासूनचं राजकारण, सत्तेतील स्थान आणि नवखा तरुण एका बाजूला याची आम्हाला जाणीव होती,” असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं.
‘मी घरी बसणार नाही’
“एखादा घरी बसला असता. मी काही घरी बसणार नाही. मी पुन्हा एकदा जोमाने, कतृत्वाने संघटना उभी करण्यासाठी दौरा करत आहे,” असा निर्धार शरद पवारांनी व्यक्त केला आहे. उद्या विजयी उमेदवारांची बैठक होणार आहे आणि परवा सर्व उमेदवार यांची जयंत पाटील यांच्या अध्यक्षते खाली बैठक होणार आहे त्याला मी ही उपस्थित राहणार आहे.
लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला?
महायुतीला लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला का? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले की, “आम्ही लोकांकडून, कार्यकर्त्यांकडून जी माहिती घेतली त्यातून हे एक महत्त्वाचं कारण आहे असं ऐकायला मिळत आहे. आम्ही सत्तेत नसलो तर पैसे देणं बंद होईल असं सांगण्यात आलं. महिलांचं मतदान वाढलं आहे असं आताच्या आकडेवारीवरुन दिसत आहे”.
“मतांचं ध्रुवीकरण झालं”
लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रकारची भूमिका जनतेने घेतली होती, तशी आता घेतली नाही. सर्वांनी कष्ट केलं पण निकाल हवा तसा लागला नाही अशी खंत शरद पवारांनी व्यक्त केली. तसंच ईव्हीएम आणि पैशांच्या आरोपांवर त्यांनी भाष्य करणं टाळलं. मी काही सहकाऱ्यांचं मत ऐकलं आहे, पण अधिकृत माहिती येत नाही तोर्यंत त्यावर भाष्य करणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं.
“बटेंगें तो कटेंगे यामुळे ध्रुवीकरण झालं. योगींनी केलेल्या विधानामागे मतांचं ध्रुवीकरण व्हावं असा दृष्टीकोन होता. धार्मिक बाजू देण्याचा प्रयत्न काही जणांनी केला त्यामुळे हे झालं असं दिसत आहे,” असंही शरद पवारांनी सांगितलं.