अपघातग्रस्त कार ने घेतला पेट, आत मध्ये असलेल्या सहा तरुणांचा कोळसा

मृतांमध्ये दोन सख्खे भाऊ
मुजफ्फरनगर /विशेष प्रतिनिधी

भरधाव कार विजेच्या खांबाला धडकून डिव्हायडर ओलांडत दुसऱ्या बाजूला पलटी झाली. त्यानंतर कारने पेट घेतला.

आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने कारमधील सहाही तरुणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचाही समावेश आहे. या घटनेमुळे हरियाणातील त्यांच्या गावांमध्ये शोककळा पसरली आहे.

सदर घटना 9 नोव्हेंबर 2026 रोजी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्ह्यातील तितावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जग्गाहेडी गावाजवळ पानीपत-खटीमा राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाला.

प्राथमिक माहितीनुसार, सहा मित्र हुंदाई ऑरा कारमधून हरियाणातील हिसार येथून हरिद्वारच्या दिशेने जात होते. कार वेगात असताना चालकाचे नियंत्रण सुटले. कार सर्वप्रथम रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबाला धडकली. त्यानंतर डिव्हायडर तोडून कार दुसऱ्या बाजूच्या रस्त्यावर पलटी झाली. या धडकेनंतर कारने अचानक पेट घेतला आणि काही क्षणांतच आगीने संपूर्ण कारला वेढले.

सदर अपघातात मृत्यू झालेल्या सहाही तरुणांची ओळख पटवण्यात आली आहे. हे सर्व हरियाणातील हिसार जिल्ह्यातील रहिवासी होते. मृतांमध्ये राहुल आणि अंकित हे दोन सख्खे भाऊ होते. यातील चार तरुण राखीगढी गावातील, तर दोन तरुण मोठ लुहारी गावातील रहिवासी होते. मृतांपैकी काहीजण शिक्षण घेत होते, तर काहीजण काम करत होते. या सहाही मित्रांचे वय साधारण 19 ते 23 वर्षांच्या दरम्यान असल्याचे वृत्त आहे.
गाडीला आग लागल्यानंतर बचावकार्य- अपघातानंतर कारमध्ये भीषण आग लागल्याने आत अडकलेल्या तरुणांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी जवळपास तासभर प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत कारमधील सहाही तरुणांचा मृत्यू झाला होता. आग इतकी भीषण होती की मृतदेह मोठ्या प्रमाणात जळाले होते. त्यानंतर कारच्या खिडक्या तोडून आणि छताचा काही भाग हटवून मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असून शवविच्छेदनाची प्रक्रिया करण्यात आली.

चालकाला डुलकी लागल्याने अपघात झाल्याची प्राथमिक शक्यता- या अपघातामागे चालकाला आलेली झोप आणि कारचा वेग ही महत्त्वाची कारणे असल्याची माहिती समोर आली आहे. दिवाळी साजरी केल्यानंतर हे मित्र रात्री प्रवासाला निघाले होते. बराच वेळ जागे राहिल्यामुळे चालकाला पहाटेच्या सुमारास डुलकी लागली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.अमर उजालाच्या वृत्तानुसार, फ्लायओव्हरवरील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार डिव्हायडरवर चढली आणि विजेच्या खांबाला धडकली. मात्र, अपघाताचे नेमके कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

हरिद्वारला गंगास्नानासाठी निघाले होते मित्र-दिवाळीचा सण साजरा केल्यानंतर या सहा मित्रांनी हरिद्वारला जाण्याचा बेत आखला होता. सोमवती अमावस्येनिमित्त गंगास्नान करण्यासाठी ते घरातून बाहेर पडले होते. मात्र, हरिद्वारला पोहोचण्याआधीच त्यांच्या कारला भीषण अपघात झाला. एकत्र प्रवासाला निघालेल्या सहा मित्रांचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या घटनेने पुन्हा एकदा महामार्गावरील वेगमर्यादा, वाहन चालवताना पुरेशी विश्रांती आणि पहाटेच्या प्रवासातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे. झोप येत असताना वाहन चालवणे किती धोकादायक ठरू शकते, याची जाणीव करून देणारी ही घटना आहे.




