ह.भ.प.राहुल साळुंखे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा,साळुंखे फरार

नाशिक / विशेष प्रतिनिधी
प्रति पंढरी आणि वारकऱ्यांचे श्रद्धास्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराज समाधी देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. राहुल साळुंखे यांच्याविरोधात बलात्काराचा अत्यंत गंभीर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे आध्यात्मिक आणि सामाजिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.
एका महिलेला लग्नाचं आमिष दाखवून तिचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप साळुंखे यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी साळुंखे फरार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, ह.भ.प. राहुल साळुंखे यांनी लग्नाचं आमिष दाखवून पीडितेशी वारंवार शारीरिक संबंध ठेवत लैंगिक शोषण केलं. मात्र, यानंतर पीडितेनं लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपी साळुंखे यांनी टाळाटाळ करायला सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडित महिलेनं नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.
या सर्व घडामोडीनंतर त्र्यंबकेश्वरच्या संत निवृत्तिनाथ संस्थानच्या अध्यक्षपदावरून राहुल साळुंके यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. संस्थानच्या विश्वस्त मंडळांनी हा मोठा निर्णय घेतला. साळुंखे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर विश्वस्त मंडळाने त्यांच्या हकालपट्टीचा ठराव मांडला होता. विश्वस्तांच्या झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा करून अध्यक्षपदावरून बडतर्फ करण्याचा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला आहे.




