हेल्मेट धारी पुरुष आणि लावण्य नावाचा तरुणीमुळे पूर्णेकर हत्याकांडाचा गुंता वाढला

ठाणे / विशेष प्रतिनिधी
प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या हत्याकांडाचा गुंता वाढत चालला आहे. ठाकरे गटाचे मानपाडा विभागप्रमुख प्रदीप उर्फ बाळू पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येचा तपास आता अत्यंत गूढ आणि रहस्यमय वळणावर येऊन पोहोचला आहे. या प्रकरणात आता एका अज्ञात ‘हेल्मेट मॅन’ आणि ‘लावण्य’ नावाच्या तरुणीची एन्ट्री झाल्यामुळे संपूर्ण हत्याकांडाचे गूढ अधिकच वाढले आहे.
पोलीस तपासात समोर आलेल्या या नव्या अँगलमुळे ही हत्या एक अत्यंत सुनियोजित ‘सुपारी किलिंग’ असण्याची शक्यता बळावली आहे.
तपासातील नवा अँगल आणि संशयास्पद चेहरे
सीसीसीटीव्ही (CCTV) फुटेजची पाहणी करत असताना मुख्य संशयित ‘टल्ली’ याच्यासोबत एक अज्ञात व्यक्ती दिसली असून तिने संपूर्ण वेळ हेल्मेट घातलेले होते. अटकेत असलेल्या इतर आरोपींनाही या हेल्मेट मॅनची ओळख पटवता आलेली नाही. त्यामुळे या व्यक्तीने मुख्य आरोपींसोबत राहून रेकी केली असण्याची शक्यता असून प्रत्यक्ष हत्येसाठी तिसऱ्याच सुपारी किलर्सचा वापर करण्यात आला असावा, असा संशय वर्तवला जात आहे.
‘लावण्य’ नावाच्या तरुणीची संशयास्पद भूमिका
हत्येपूर्वी पूर्णेकर यांच्या कार्यालयात ‘लावण्य’ नावाची तरुणी आली होती. तिने माफी मागण्याच्या बहाण्याने भेट घेऊन मारेकऱ्यांना टीप दिली का, याचा तांत्रिक तपास पोलीस करत आहेत. काही दिवस आधी प्रदीप पूर्णेकरांनी या तरुणीला अन्य दोन तरुणांसोबत एका खोलीत पकडलं होतं. तिघेही कथितपणे अमली पदार्थांचं सेवन करत असल्याचा संशय आहे. यावेळी पूर्णेकरांनी तरुणीसोबतच्या दोन तरुणांना मारहाण करत पोलीस ठाण्यात नेलं होतं. या प्रकरणाबाबत माफी मागायला ही तरुणी आली असावी, आणि त्यानंतर टीप दिली असावी, असा संशय आहे. या हत्याकांडातील मुख्य संशयित आरोपी संतोष कनोजिया उर्फ ‘टल्ली’ अद्याप पोलिसांना गुंगारा देत फरार असून पोलीस त्याचा सर्वत्र शोध घेत आहेत.
१०० सीसीसीटीव्ही फुटेज अन् ९ पथकांचा समांतर तपास
या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी गुन्हे शाखेकडून तब्बल १०० हून अधिक सीसीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले आहेत. ठाणे पोलिसांच्या ९ विशेष पथकांद्वारे या प्रकरणाचा समांतर तपास सुरू आहे. या प्रकरणात आतापर्यंत पप्या शिंदे, निखिल यादव आणि नितेश पवार या आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना ८ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पूर्णेकर हत्याकांडानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणातील पीआयच्या (वरिष्ठ पोलीस निरीक्षक) संशयास्पद भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. दुसरीकडे, माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचीही या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर सत्ताधारी आणि स्थानिक नेत्यांनी या संपूर्ण प्रकरणाची पूर्ण निष्पक्षपणे चौकशी करून मुख्य सूत्रधारांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.




