उप्पलवाडी औद्योगिक वसाहतीसाठी संयुक्त पाहणी


*उप्पलवाडी औद्योगिक वसाहतीच्या विकासाला डॉ. नितीन राऊत यांचा पुढाकार; जिल्हाधिकाऱ्यांसोबत संयुक्त पाहणी*
*₹१५० कोटींच्या निधीची मागणी; रस्ते, भूमिगत नाल्या, पथदिवे, जलनिस्सारणासह विविध प्रश्नांवर चर्चा*
नागपूर, दिनांक ०४/०९/२०२६
उप्पलवाडी औद्योगिक वसाहतीतील पायाभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार व राज्याचे माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुन्हा एकदा प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. डॉ. राऊत यांनी शुक्रवारी नागपूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासोबत उप्पलवाडी औद्योगिक वसाहतीची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी औद्योगिक क्षेत्रातील रस्ते, भूमिगत नाल्या, पावसाच्या पाण्याचा निचरा, पथदिवे, सांडपाणी व्यवस्था, वाहतूक तसेच परिसराच्या सुशोभीकरणाबाबत चर्चा करण्यात आली.
उप्पलवाडी औद्योगिक वसाहत सुमारे २२.०९ एकर क्षेत्रात विस्तारलेली असून येथे सुमारे १०० छोटे-मोठे उद्योग आणि दहा ते बारा हजार कामगार कार्यरत असल्याचे डॉ. राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. औद्योगिक वसाहत जुनी असूनही अनेक वर्षांपासून मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने उद्योजक आणि कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
*१५० कोटींच्या निधीची मागणी*
उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी नागपूर सुधार प्रन्यासमार्फत सुमारे ₹११३ कोटींचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. मात्र, यापेक्षा व्यापक स्वरूपात रस्ते, भूमिगत नाल्या, पथदिवे, सांडपाणी व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधांसाठी सुमारे ₹१५० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी डॉ. राऊत यांनी केली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यापूर्वीही डॉ. राऊत यांनी उप्पलवाडी औद्योगिक वसाहतीचा प्रश्न सातत्याने उपस्थित केला होता. संबंधित यंत्रणांनी केवळ पत्रव्यवहार न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याची भूमिका डॉ. राऊत यांनी घेतली आहे.
उप्पलवाडीला बाह्य रिंगरोडशी जोडण्यासाठी कामठी रोडपासून सुमारे १.८ किलोमीटरचा १८ मीटर रुंदीचा मार्ग विकसित करण्याचा प्रस्ताव आहे. तसेच दीपकनगर ते उप्पलवाडी औद्योगिक क्षेत्रापर्यंत २४ मीटर रुंदीचा मार्ग प्रस्तावित आहे.
*जुन्या डीपीआरचा प्रश्नही ऐरणीवर*
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ संदर्भातील जुन्या डीपीआरमध्ये करण्यात आलेल्या बदलांना मंजुरी मिळाली आहे किंवा नाही, याबाबतही या वेळी चर्चा करण्यात आली. संबंधित बाबींची प्रशासकीय पातळीवर तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली.
औद्योगिक वसाहतीतील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था, तसेच परिसरातील अन्य जलव्यवस्थापनाच्या उपाययोजनांवरही भर देण्याची आवश्यकता डॉ. राऊत यांनी व्यक्त केली.
*नवीन पोलीस ठाणे, वृक्षारोपण आणि सुशोभीकरण*
उप्पलवाडी परिसरातील वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक हालचाली लक्षात घेता नवीन पोलीस ठाण्याची आवश्यकता असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. त्याचबरोबर परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यासह औद्योगिक वसाहतीचे सुशोभीकरण करण्याबाबतही चर्चा झाली.
औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी केवळ उद्योगांना सुविधा उपलब्ध करून देणे पुरेसे नसून, त्यासोबत रस्ते, प्रकाश व्यवस्था, पाणी व जलनिस्सारण यांसारख्या मूलभूत सुविधांचाही विकास आवश्यक असल्याची भूमिका डॉ. राऊत यांनी मांडली.
*उद्योगांच्या प्रश्नांवर ठोस कार्यवाहीचे निर्देश*
उप्पलवाडी इंडस्ट्रियल इस्टेटच्या विकासाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असताना स्थानिक आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रथमच या औद्योगिक वसाहतीला प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. या औद्योगिक समूहात सुमारे १० ते १२ हजार मजूर कार्यरत असून, वसाहतीच्या स्थापनेपासून प्रथमच जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्याने उद्योजकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले.
पाहणीनंतर सोसायटी कार्यालयात उद्योजकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी उपस्थित उद्योजकांच्या समस्या व भावना जाणून घेतल्या. यावेळी स्थानिक आमदार म्हणून डॉ. नितीन राऊत यांनीही उप्पलवाडी इंडस्ट्रियल इस्टेटच्या विकासासंदर्भातील आपली भूमिका मांडली. उप्पलवाडी इंडस्ट्रियल इस्टेटच्या विकासाच्या प्रश्नावर शासन दरबारी आपण उद्योजकांच्या सोबत आहोत, असे आश्वासन डॉ. राऊत यांनी यावेळी दिले.
बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता, एमआयडीसी आणि महाव्यवस्थापक, उद्योग संचालनालय यांना नागपूर सुधार प्रन्यासने तयार करून सादर केलेल्या विकास आराखड्याचा तपास करण्याचे निर्देश दिले. तसेच उप्पलवाडी इंडस्ट्रियल क्लस्टरचा स्वतंत्र विकास आराखडा सादर करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देशही देण्यात आले.
डॉ. राऊत यांच्या पुढाकारामुळे उप्पलवाडीच्या दीर्घकाळ प्रलंबित विकास प्रश्नाला आता प्रशासकीय पातळीवर चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


