शूटिंग कोच सादिक खान ला युपी मधून अटक
राजमुंद्री ( आंध्रप्रदेश ) / विशेष प्रतिनिधी
आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथील गोदावरी नदीच्या रोड-कम-रेल्वे पुलावरून उडी मारून एकाच कुटुंबातील तीन सदस्यांनी स्वत:ला संपवले. त्यांच्या मृत्यूनंतर आता या प्रकरणी मोठे खुलासे झाले आहेत. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशीत करत असताना वेदनादायी घटनेमागे शूटिंग कोच सादिक खानचे भयंकर चक्रव्यूह उघड झाले आहे. आरोपीने कुटुंबावर धर्मांतरणाचा दबाव टाकला, मालमत्ता हडपली आणि ब्लॅकमेल केले. आंध्र प्रदेश पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाने (एसआयटी) पाच राज्यांत तपास केल्यानंतर आरोपी सादिक खानला उत्तर प्रदेशातील मेरठहून अटक केली आहे. काकीनाडा कोर्टाने त्याला १४ दिवसांच्या न्यायिक कोठडीत पाठवले आहे.
ही घटना १७ ऑगस्टच्या रात्री उशिरा घडली आहे.
पिठापुरम येथे पंचायती राज विभागात कार्यरत ६१ वर्षीय सहाय्यक अभियंता थिल्लापुडी नूकाराजू, त्यांची ५८/५९ वर्षीय पत्नी मीना आणि ३४/३८ वर्षीय मुलगी कोव्वूरी सौजन्या यांनी आपल्या १० वर्षीय नातू/मुला रियांशसोबत गोदावरी नदीच्या पुलावरून उडी मारली होती. घटनेदरम्यान १० वर्षांचा अल्पवयीन रियांश पुलाच्या ग्रीलमध्ये अडकून पाण्यात पडला आणि तरंगत राहिला. सुमारे २० मिनिटे पाण्याशी संघर्श केल्यानंतर स्थानिक मच्छीमार आणि पोलिसांच्या मदतीने त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. मात्र नूकाराजू, मीना आणि सौजन्या यांचा नदीत बुडून मृत्यू झाला.
पोलिसांना घटनास्थळी आणि व्हॉट्सअॅप मेसेजेसद्वारे मृत कुटुंबाच्या लिहिलेल्या आत्महत्या नोट्स मिळाल्या. नूकाराजूने आत्महत्या नोट काकीनाडाचे जिल्हाधिकारी आणि एसपी यांनाही पाठवली होती. आत्महत्या नोटमध्ये सौजन्याने शूटिंग कोच सादिक खानच्या छळाचा उल्लेख केला आहे. सादिक खान सौजन्यावर जबरदस्तीने धर्मांतर करून इस्लाम स्वीकारण्याचा दबाव आणत होता. तिला दररोज इस्लामची पुस्तके वाचून नोट्स तयार करण्यास भाग पाडले जात होते आणि नकार दिल्यास मारहाण केली जात होती.
तिच्या पतीच्या मृत्यूनंतर, सादिक सहानुभूती दाखवण्याचे नाटक करून तिच्या घरात घुसला आणि फसवणूक करून तिच्या बँक लॉकरच्या चाव्या, मोबाईल फोन आणि मालमत्तेची कागदपत्रे घेतली. त्याने सौजन्याला तिच्या १० वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याला दहशतवाद्यांना विकण्याची धमकी दिली.
पतीच्या हत्येचाही आरोप, नवा एफआयआर दाखल
प्रकरणाने तेव्हा अधिक गंभीर वळण घेतले जेव्हा सौजन्याचे सासरे भास्कर रेड्डी यांनी पोलिसांकडे स्वतंत्र तक्रार दाखल केली. सादिक खाननेच २ जुलैला सौजन्याचे पती जगदीश रेड्डी यांना विषारी रसायन किंवा इंजेक्शन देऊन मारले होते, जेणेकरून तो संपूर्ण कुटुंब आणि त्यांच्या मालमत्तेवर आपले नियंत्रण प्रस्थापित करू शकेल असे तक्रारीमध्ये म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे काकीनाडा पोलिसांनी सादिक खानविरुद्ध हत्ये (आयपीसी/बीएनएस) चा नवा गुन्हा दाखल केला आहे.