गुरुजी म्हणले वेळ असेल तर ये आणि……


मुंबई / विशेष प्रतिनिधी
द्रोणाचार्य पुरस्कार विजेता शिक्षकाचे कृत्य पाहून तुमची तळपायाची आग मस्तकात गेल्या शिवाय राहणार नाही. जिमनॅस्टिशियन असलेल्या या शिक्षकाने अल्पवयीन मुलीला तिच्या मोबाईल वर मॅसेज करून व्यायाम शाळेत भेटायला बोलावले अन्…
विलेपार्ले पूर्व येथील पार्लेश्वर व्यायामशाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.या प्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी 48 वर्षीय जिम्नॅस्टिक प्रशिक्षक गणेश देवरुखकर याच्याविरोधात POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.या घटनेने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान अल्पवयीन मुलगी जीममध्ये गेलीच कशी?आणि तिच्यासोबत नेमकं काय घडलं? हे जाणून घेऊयात.
खरं तर जिम्नॅस्टिक प्रशिक्षक गणेश देवरुखकर याला 2023 मध्ये राष्ट्रपतींच्या हस्ते द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.आणि संबधित प्रशिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण देत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीनुसार,अल्पवयीन मुलगी विलेपार्ले पूर्व येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून, ती सुमारे दहा वर्षांपासून जिम्नॅस्टिक शिकत होती.गणेश देवरुखकर हा तिचा जिम्नॅस्टिक प्रशिक्षक होता.मात्र, दहावीच्या अभ्यासामुळे मागील वर्षभरापासून ती नियमितपणे व्यायामशाळेत जात नव्हती.
दरम्यान 21 ऑगस्ट 2026 शुक्रवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास अल्पवयीन मुलगी घरी अभ्यास करत होती. याचवेळी तिला गणेश देवरुखकर याने तिच्या मोबाईलवर ‘HI’ असा व्हॉट्सअॅप मेसेज केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत मुलीने आपल्या आईला सांगितल्यानंतर आईने तिला शिक्षक काय म्हणतात ते पाहण्यास सांगितले.
त्यानंतर देवरुखकर याने ‘कुठे आहेस, फ्री असेल तर व्यायामशाळेमध्ये भेटायला ये’ असा संदेश पाठवल्याचे तक्रारीत नमूद केले.त्यावर मुलीने आपण घरी असल्याचे सांगून व्यायामशाळेत येत असल्याचे कळवले.
सकाळी 11 वाजता ती पार्लेश्वर व्यायामशाळेत पोहोचली. त्यावेळी व्यायामशाळेत देवरुखकर एकटाच असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. मुलगी चप्पल काढत असताना त्याने तिला दरवाजाला कडी लावण्यास सांगितल्याचा आरोप आहे.
यानंतर देवरुखकर याने तिच्या कॉलेजची वेळ, कोणत्या कॉलेजमध्ये शिक्षण घेते आणि कोणत्या शाखेत आहे, याबाबत विचारपूस केली.मुलीने आपण विलेपार्ले पूर्व येथील ज्युनिअर कॉलेजमध्ये कॉमर्स शाखेत शिकत असून, कॉलेजची वेळ दुपारी साडेबारा ते साडेपाच असल्याचे सांगितले.
त्यानंतर मुलगी व्यायामशाळेतून बाहेर जाण्यास निघाली असताना देवरुखकर याने तिचा विनयभंग केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीने तात्काळ तिथून उठण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी देवरुखकर याने ‘मी तुझे लाड करू शकतो का?’ असे विचारल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुलीने त्याला नकार दिल्यानंतर ‘आज जे काही झाले ते आपल्यातच राहू दे’ असे सांगितल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर अल्पवयीन मुलगी घरी परतली. मात्र, घडलेल्या प्रकारामुळे तिचे मन अस्वस्थ झाले होते. त्यानंतर ती कॉलेजला गेली. कॉलेजमध्येही ती घाबरलेली आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे तिच्या मैत्रिणींच्या लक्षात आले.तिने आपल्या मैत्रिणीला घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर ती रडू लागल्याने इतर मैत्रिणींनीही तिची विचारपूस केली आणि तिने त्यांनाही संपूर्ण घटना सांगितली. मैत्रिणींनी हा प्रकार कॉलेजच्या पीटी शिक्षकांना सांगितला. त्यानंतर संबंधित शिक्षिकांनी मुलीला बाहेर घेऊन जाऊन तिला शांत केले.
घटनेनंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीच्या आधारे विलेपार्ले पोलिसांनी गणेश देवरुखकर याच्याविरोधात POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
द्रोणाचार्य पुरस्कारासारख्या प्रतिष्ठेच्या सन्मानाने गौरवण्यात आलेल्या प्रशिक्षकावर अल्पवयीन विद्यार्थिनीने केलेल्या या गंभीर आरोपामुळे जिम्नॅस्टिक प्रशिक्षण क्षेत्रातही खळबळ उडाली आहे. पोलिस तपासातून या प्रकरणातील पुढील तथ्ये समोर येणार आहेत.




