क्राइम

सोशल मीडियावर ओळख, महिला येऊन तरुणाच्या घरी राहिली

Spread the love

महिलेच्या पती आणि मुलाकडून बेदम मारहाण, तरुणाचा मृत्यू 

सोलापूर / विशेष प्रतिनिधीं

                 ट्रॅक्टर चालक तरुणाची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून महिले सोबत झाली. महिला तरुणाच्या घरी येऊन दोन दिवस राहिली. त्यानंतर ती पुन्हा तरुणाच्या घरी आली आणि लग्नासाठी आग्रह धरू लागली. त्यानंतर ती त्याच्या घरी आली तर परत गेलीच नाही. पती आणि मुलगा तिला घ्यायला आल्यावर तिने नकार देत जीवाचे बरे वाईट करण्याचे म्हटले. त्यानंतर जेव्हा पती आणि मुलगा तिच्याकडे आला तेव्हा ती घरी नव्हती. तरुणाला महिलेने बोलावल्याचा निरोप मिळाला. तो महिलेला भेटायला गेला असता त्याला बेदम मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

ट्रॅक्टर चालक अरविंद बाळू मस्के (वय २७ , र. तरटगाव) या तरुणाची माळुंब्रा (ता. तुळजापूर) येथील ४२ वर्षीय महिलेसोबत ओळख झाली. महिलेचा पती, मुलगा व इतरांनी अरविंदला १५ ऑगस्ट रोजी बेदम मारहाण केली.

यात शनिवारी (ता. २२) उपचारादरम्यान अरविंदचा मृत्यू झाला. या प्रकरणी मृताच्या आईने तामलवाडी पोलिसांत फिर्याद दिली. त्यावरून संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, न्यायालयाने त्यांना २७ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली आहे.

तरटगाव येथील अरविंद आई-वडिलांना एकुलता एक होता. काही महिन्यांपूर्वी इन्स्टाग्रामवरून ओळख झालेल्या माळुंब्रा येथील एका महिलेसोबत अरविंद तीन महिन्यांपासून फोनवर बोलत होता. एप्रिलमध्ये ती महिला अरविंदच्या घरी आली आणि दोन दिवस मुक्कामी राहिली. त्यानंतर काही दिवसांनी ती पुन्हा अरविंदकडे आली आणि लग्नासाठी आग्रह करू लागली. दीड महिन्यांपूर्वी ती पुन्हा आली आणि सासरी गेलीच नाही. महिलेचा पती तिला न्यायला आल्यावर तिने जाण्यास नकार देत जिवाचे बरे-वाईट करण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेचा पती तेथून निघून गेला. काही दिवसांनी पुन्हा महिलेचा पती, मुलगा व अन्य काहीजण तरटगावला आले, पण तेव्हा महिला घरी नव्हती. १३ ऑगस्टला अरविंद घरी आला आणि महिलेने भेटायला बोलावल्याचे त्याने आईला सांगितले.

१५ ऑगस्टला अरविंद महिलेला भेटायला म्हणून घराबाहेर पडला. महिलेचा पती, मुलगा व त्यांच्या अन्य साथीदारांनी मिळून अरविंदला बेदम मारहाण केली. यात तो गंभीर जखमी झाला आणि महिलेचा पती, मुलगा त्याला घेऊन तामलवाडी पोलिस ठाण्यात गेले. पोलिसांनी त्याला उपचाराची गरज असल्याने अरविंदला उपचारासाठी सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. २२ ऑगस्टला उपचारादरम्यान अरविंदचा मृत्यू झाला. त्याच्या आईच्या फिर्यादीवरून तामलवाडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक मनोहर पाटील करीत आहेत.

मारहाण करून संशयित पोलिस ठाण्यात

माळुंब्रा गावाकडे येणाऱ्या रोडवरच १५ ऑगस्ट रोजी महिलेचा पती, मुलगा व इतरांनी अरविंदला वायर, लाकडाने व लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली होती. त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या अरविंदला घेऊन संशयित आरोपी पोलिस ठाण्यात स्वत: हजर झाले होते. त्या महिलेसोबत मृत अरविंदची ओळख इन्स्टाग्रामवरून झाली होती, असेही पोलिसांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close