सात तास होता तो झाडावर अडकून, खाली पाण्याचा प्रवाह तर झाडावर विषारी साप


प्रतिनिधी/ धरणगाव
जीवनात कधी कुठला प्रसंग येईल याचा काही नेम नसतो. शेतात गेलेल्या सुरेश भील याल याची पुसटशीही कल्पना नव्हती की त्याला सात तास झाडावर काढावे लागतील.तेही विषारी सापाच्या सानिध्यात.
जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील चावलखेडे येथे घडली आहे. दुपारी दोन वाजता सुरू झालेला मृत्यूसोबतचा सामना तब्बल सात तास चालला. रात्री नऊ वाजेपर्यंत सुरेश भील नावाचा तरुण मृत्यूच्या दोन जबड्यांमध्ये अडकून पडला होता, खाली दुथडी भरून वाहणारी अंजनी नदी होती, तर वर तीन विषारी सापांचा विळखा होता.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी सुरेश भील हा नेहमीप्रमाणे अंजनी नदीपात्रात मासे पकडण्यासाठी उतरला होता. त्याचवेळी वरच्या भागात झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे अंजनी नदीला अचानक मोठा पूर आला. काही क्षणांतच नदीने रौद्ररूप धारण केलं. जीव वाचवण्यासाठी सुरेशने नदीतील एका झाडावर चढून आसरा घेतला. काही वेळात पाणी ओसरेल आणि आपण खाली उतरू, अशी त्याची अपेक्षा होती. मात्र उलट नदीचा प्रवाह अधिकच वेगवान होत गेला.
वेळ पुढे सरकत होती. दुपार संध्याकाळीत बदलली, पण सुरेशची सुटका होत नव्हती. खाली खवळलेले पुराचे पाणी आणि वर झाडाच्या फांदीवर बसलेला सुरेश… प्रत्येक क्षण त्याच्यासाठी मृत्यूशी सुरू असलेली झुंज ठरत होती. याचदरम्यान संकटाने आणखी भयंकर रूप घेतले.
सुरेश ज्या झाडावर बसला होता, त्याच झाडावर एकामागून एक तीन विषारी साप चढले. काही क्षण तोही हादरला. मात्र प्रसंगावधान राखत आणि मोठे धाडस दाखवत त्याने त्यापैकी दोन सापांना झाडावरून खाली पुराच्या पाण्यात फेकून दिले. पण तिसरा साप आकाराने मोठा आणि अत्यंत आक्रमक होता. तो सतत फणा काढून समोरच ठाण मांडून बसला होता. त्यामुळे त्याला खाली फेकण्याचे धाडसही सुरेशला करता आले नाही. एका बाजूला प्रचंड वेगाने वाहणारं पूराचं पाणी आणि दुसऱ्या बाजूला काही फुटांवर दबा धरून बसलेला विषारी साप… अशा परिस्थितीत त्याने तब्बल सात तास काढले.
दरम्यान, नदीकाठावर प्रशासन, महसूल विभाग, अग्निशमन दल, पोलीस आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकजण सुरेशला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. मात्र नदीचा वेग इतका प्रचंड होता की कोणालाही त्याच्यापर्यंत पोहोचणे शक्य होत नव्हते. प्रत्येक मिनिटागणिक परिसरातील नागरिकांची धाकधूक वाढत होती.
अखेर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत अंजनी धरणाचे उघडलेले दोन दरवाजे सुमारे दोन तासांसाठी बंद केले. त्यानंतर नदीतील पाण्याचा वेग हळूहळू कमी होऊ लागला. पाणी ओसरू लागल्यावर झाडावर थांबलेला तो आक्रमक सापही खाली उतरून पुराच्या पाण्यात निघून गेला.
रात्री साधारण नऊ वाजता योग्य संधी साधत प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली सुरेश भीलने झाडावरून थेट नदीत उडी घेतली. पुराच्या पाण्याशी झुंज देत तो पोहत पोहत चावलखेडे रेल्वे उड्डाणपुलाजवळ नदीपात्राबाहेर सुखरूप पोहोचला. त्याला सुरक्षित बाहेर येताना पाहताच नदीकाठावर उपस्थित नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
दुपारी २ ते रात्री ९… तब्बल सात तास सुरेश भीलने मृत्यूची दोन भीषण रूपे एकाच वेळी अनुभवली. खाली प्रचंड पूर आणि समोर विषारी साप. नशीब, स्वतःचे धैर्य आणि प्रशासनाचे वेळेवर घेतलेले निर्णय यामुळेच तो या मृत्यूच्या विळख्यातून सुखरूप बाहेर पडू शकला.
या संपूर्ण बचाव मोहिमेत प्रशासनासोबत चावलखेडा गावातील ग्रामस्थांनीही मोलाची भूमिका बजावली. तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक उमाकांत गाजय वाघमारे, प्रतिनिधी धरणगाव : एखाद्या थरारपटालाही लाजवेल अशी घटना जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव तालुक्यातील चावलखेडे येथे घडली आहे. दुपारी दोन वाजता सुरू झालेला मृत्यूसोबतचा सामना तब्बल सात तास चालला.यकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, चावलखेडा येथील पोलीस पाटील प्रशांत तायडे, सरपंच अरुण गायकवाड, तलाठी आप्पा, अनिकेत खाडे, जितेंद्र पाटील, पंकज भालेराव, मोनिश शेख, अरुण पाटील आणि रोहित सपकाळे यांनी घटनास्थळी उपस्थित राहून बचावकार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या समन्वय, धावपळ आणि प्रशासनाला केलेल्या सहकार्यामुळे ही जीवघेणी मोहीम यशस्वी ठरली. मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर पडलेल्या सुरेश भीलच्या या थरारक सुटकेची चर्चा सध्या संपूर्ण परिसरात रंगली आहे.




