बायकोने नवऱ्याला ती सवय सोडण्यास हटकले आणि तेच त्याला खटकले

सोलापूर / विशेष प्रतिनिधी
नवरा आणि बायको यांच्यात भांडण हा काही नवीन प्रकार नाही. या दोघात काही ना काही गोष्टीवरून वाद होत असतात. काही नवरा बायको काही दिवस एकमेकांशी बोलत देखील नाही.पण कालांतराने सगळे व्यवस्थित देखील होते. आणि त्यांच्या संसाराचा गाडा सुरू राहतो.पण काही वेळा हा शुल्लक वाद विकोपाला जातो आणि काहीतरी अघटीत होऊन बसते. असाच प्रकार सोलापूर मधून समोर आला आहे.नवऱ्याला दारूचे व्यसन असल्याने बायकोने त्याला तुम्ही दारू सोडा नाही तर मी माहेरी निघून जाईल बस इतकेच म्हटले.या गोष्टीचा त्याला इतका राग आला की त्याने तिची हत्याच करून टाकली.
गायत्री यशवंत हेगडे (वय २३, रा. वडापूर, ता. दक्षिण सोलापूर, सध्या कुरुल, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असं मृत महिलेचं नाव आहे. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
….तर मी माझ्या आईकडे माहेरी जाईन
याप्रकरणी तिचा पती यशवंत ऊर्फ आबू भारत हेगडे याच्याविरुद्ध कामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बायकोनं माहेरी जाण्याची धमकी दिल्याने पतीने रागाच्या भरात पत्नीवर हल्ला करून तिचा खून केल्याची माहिती समोर आली आहे. तुम्ही दारू प्याल, तर मी माझ्या आईकडे माहेरी जाईन, असे पत्नीने पतीला सांगितले. याच रागातून पतीने पत्नीवर कोयता आणि विटेने हल्ला चढवला. या हल्ल्यात जखमी झालेल्या पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
वाद इतका पेटला की यशवंतने…
मोहोळ तालुक्यातील कुरुल परिसरात सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. कुरुल ते कातेवाडी रस्त्यावरील बिरू मोटे यांच्या वीटभट्टीवर हेगडे दाम्पत्य राहत होते. गायत्रीच्या नवऱ्याला दारूचं व्यसन होतं. . यावरून दोघांमध्ये वाद झाला. काही वेळानंतर वाद इतका पेटला की यशवंतला काय करावं कळेना. संतप्त यशवंतने गायत्रीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर वीट आणि ऊस तोडणीच्या कोयत्याने तिच्या डोक्यात, चेहऱ्यावर तसेच डाव्या हातावर वार केले.
यशवंतविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल
दरम्यान, हल्ल्यात गंभीर जखमी झालेली गायत्री जागीच कोसळली आणि दुर्दैवाने तिचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच कामती पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पती यशवंतविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू आहे.




