क्राइम
महिला घराच्या आत जायच्या आणि काही वेळाने बाहेर निघायच्या


पोलिसांनी केला या प्रकरणाचा पर्दाफाश
पुणे / विशेष प्रतिनिधी
शिक्षणाचे माहेर घर म्हणून नावारूपास असलेल्या पुणे शहराला मागील काही कालावधीपासून क्राइम ने आपल्या विळख्यात घेतले आहे. क्राईम पुरते ठीक होते .पण आता जो प्रकार समोर येत आहे. तो पुरोगामी महाराष्ट्र म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्राच्या नावावर काळीमा लावणारा आहे. येथे पोलिसांनी अशा प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे की सामान्य माणूस सुद्धा अशा लोकांना शिव्या हासडल्या शिवाय राहणार नाही.
पुणे जिल्ह्यातून एक अत्यंत थरारक आणि मन सुन्न करणारा प्रकार उघडकीस आला आहे. दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात पैशांच्या हव्यासापोटी चक्क घरातच काळा धंदा सुरू असल्याचा पर्दाफाश झाला आहे. एका पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने घरात गुप्तपणे चालू असलेल्या या गर्भलिंग निदानाचा पोलिसांनी अत्यंत नाट्यमयरित्या पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या एका कारवाईनंतर पुण्यातील वैद्यकीय क्षेत्रात भूकंपाची परिस्थिती निर्माण झाली असून, तब्बल १० ते १५ नामांकित डॉक्टर आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत.
३५ ते ५० हजारांची ‘डील’
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात गरोदर महिलांची गुप्तपणे गर्भलिंग तपासणी केली जात होती. यासाठी दलालांमार्फत थेट ३५ ते ५० हजार रुपयांची मोठी रक्कम उकळली जात होती. घरातच एका पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या माध्यमातून हा बेकायदेशीर खेळ खेळला जात होता. हे केवळ एका व्यक्तीचे काम नसून, यामागे दलाल, एजंट आणि बड्या डॉक्टरांचे एक मोठे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा संशय पोलिसांना आला.
या रॅकेटचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी युद्धपातळीवर तपासाची चक्रे फिरवली. २० मे रोजी पोलिसांनी केडगाव परिसरात छापा टाकून मुख्य बोगस डॉक्टर अण्णासाहेब गिरी याला रंगेहात अटक केली. २४ मे रोजी अण्णासाहेबच्या चौकशीतून मिळालेल्या धाग्यादोरऱ्यांवरून पोलिसांनी थेट वाघोली गाठले आणि तिथून डॉ. जाधव याला बेड्या ठोकल्या. या दोघांनाही दौंड न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने गुन्ह्याची संवेदनशीलता लक्षात घेऊन दोघांनाही ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन्ही डॉक्टरांविरोधात यवत पोलीस ठाण्यात अत्यंत कडक अशा PCPNDT कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘न्यूज १८ मराठी’ला मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार, दौंड तालुक्यात गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गर्भलिंगनिदान आणि भ्रूणहत्येचे प्रकार घडले आहेत. या क्रूर काळ्या धंद्यामुळे दौंड परिसरातील स्त्री-पुरुष गुणोत्तर कमालीचे घसरले असून, ते दर १ हजार मुलांमागे अवघे ८२४ मुली इतके खाली आले आहे. ही आकडेवारी समोर आल्यानंतर सामाजिक वर्तुळात प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
पुण्यासारख्या प्रगत आणि सुशिक्षित जिल्ह्यात इतके मोठे आणि अमानुष रॅकेट फोफावेपर्यंत आरोग्य विभाग आणि स्थानिक पोलीस यंत्रणा नेमक्या काय करत होत्या, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, हे रॅकेट संपूर्ण पुणे जिल्ह्यात पसरलेले असण्याची शक्यता असून, पुढील चौकशीत आणखी अनेक डॉक्टरांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.




