बंधाऱ्याच्या तुटलेल्या भिंतीने ग्रामस्थांच्या जिवाला धोका
वरूड/तूषार अकर्ते
तालुक्यातील पेठ आणि मांगरुळी या दोन्ही गावांच्या मध्यभागातुन वाहत असलेल्या नदी पात्रात बांधण्यात आलेली बंधाऱ्याची भिंत मागील वर्षीच्या पुरातच खचुन नदी पात्रात आडवी झाली. परिणामी मांगरुळी गावात पाणी शिरले. या घटनेच्या खानाखुणा अजून शिल्लक असतांनाच तब्बल एक वर्ष होऊन सुद्धा या भिंतिची दुरुस्ती न केल्याने पुराचे पाणी पुन्हा गावात शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असुन बंधाऱ्याच्या भींतीचे बांधकाम त्वरित करण्याची मागणी ग्रामस्थांकडुन केल्या जात आहे.
प्राप्त माहीतीनुसार तालुक्यातील शक्ती (सोकी) नदीच्या काठावर असलेले मांगरुळी आणि पेठ हि दोन्ही गावे आहे. या दोन्ही गावांच्या मध्यभागातून शक्ती (सोकी) नदी वाहते. या नदीवर काही वर्षांपूर्वी बंधारा बांधण्यात आला आहे. मात्र मागीलवर्षी नदीला आलेल्या पुरात या बंधाऱ्याची भिंत खचली व ती नदी पात्रातच आडवी झाली. परिणामी नदीच्या प्रवाहास ती अडचण निर्माण करीत असुन नदीला पुर आल्यास पुराचे पाणी वळते होऊन थेट मांगरुळी गावात शिरल्याने गावातील अनेकांचे संसार उध्वस्त होऊन त्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. घटनेनंतर लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाच्या गाड्या धुराळा उडवित गावात दाखल होतात खरे मात्र खोटी आश्वासने देउन वेळ मारून नेली जाते. या खचलेल्या बंधाऱ्याची खासदार, आमदार तसेच संबंधीत अधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाहणी केली. दुरुस्तीसाठी आश्वासन दिले. मात्र तब्बल १ वर्ष लोटुन सुद्धा या बंधाऱ्याची भिंत तशीच उभी आहे. मागची परिस्थिती जैसे तेच असल्याने यावर्षी नदीला आलेल्या पुराचे पाणी पुन्हा गावात शिरण्याची शक्यता निर्माण झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण दिसुन येत आहे. यामुळे या बंधाऱ्याच्या भींतीचे बांधकाम त्वरित करण्याची मागणी ग्रामस्थांकडुन केल्या जात आहे.
चौकटीत
नुकसान झाल्यास लोकप्रतिनिधी जबाबदार.
वरुड-मोर्शी विधानसभा मतदार संघात २ सत्ताधारी खासदार आणी १ अपक्ष आमदार असे ३ लोकप्रतिनिधी असतांना मागील १ वर्षी पासून एका बांधाऱ्याची दुरुस्ती करू शकत नाही.याला दुर्भाग्यच म्हणावे लागेल. या बंधाऱ्यांची त्वरीत दुरुस्ती न झाल्यास आता आम्ही लोकप्रतिनिधिंना गावबंदी करू. यामुळे तातडीने जेसीबीच्या सहाय्याने बंधाऱ्याची ती नदी पात्रात आडवी झालेली भिंत बाजूला करून नागरिकांचे पुराच्या पाण्यापासून संरक्षण करावे. यावर्षी पुराच्या पाण्याने नुकसान झाल्यास लोकप्रतिनिधी जबाबदार राहील असा इशारा सुद्धा पेठ येथील ग्रामस्थ वैभव पोतदार यांनी दिला आहे.