ती आई वाचव असे ओरडली नसती तर बापानेच तोडले असते तिच्या शरीराचे लचके

वेगळ्या खोलीत गाढ झोपेत असलेल्या १३ वर्षीय मुलीवर स्वतःचा वडिलांकडूनच बलात्काराचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. गाढ झोपेत असलेल्या मुलीच्या खोलीत शिरून बापाने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मुलगी आई वाचव.आई वाचव.असे ओरडली असता तिचे तोंड दाबण्याचा प्रयत्न झाला. पण दुसऱ्या खोलीत झोपलेल्या आईच्या कानावर मुलीच्या ओरडण्याचा आवाज गेल्यावर तिने तिकडे धाव घेतली असता मुलीच्या खोलीतील प्रकार पाहून तिला काही क्षण काय करावे ? सुचले नाही. शेवटी तिने पतीला मुलीच्या अंगावरून बाजूला सारत मुलीची सुटका केली.ही मन हेलावणारी घटना कर्जत येथे घडली आहे.
या कृत्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत असून पवित्र नात्याला काळीमा फासणाऱ्या या आरोपीला कर्जत पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्जत शहरातील मुद्रे भागात आरोपी रमेशसिंग परिहार (वय 45 वर्ष) हा आपल्या कुटुंबासह राहतो. पीडित मुलगी 13 वर्षांची असून ती घरात गाढ झोपलेली असताना, या नराधम बापाने रात्रीच्या वेळी तिच्या खोलीत प्रवेश केला. विकृतीची परिसीमा गाठत आरोपीने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने प्रतिकार करत ओरडण्याचा प्रयत्न केला असता, नराधमाने तिचे तोंड दाबून तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला.
कशी केली मुलीची सुटका?
पीडित मुलीने हिंमत न हारता स्वतःची सुटका करून घेण्यासाठी ‘मम्मी मम्मी’ असा आरडाओरजा केला. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकून तिची आई तातडीने झोपेतून जागी झाली. समोर चाललेला भयानक प्रकार पाहून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. तिने तात्काळ नराधम पतीला ढकललले आणि बेदम मारहाण केली आणि आपल्या पोटच्या मुलीला त्याच्या तावडीतून सोडवले. पत्नीचा रुद्र अवतार पाहून पतीने घरातून पळ काढला.
नराधम बापाच्या मुसक्या आवळल्या
या घटनेनंतर पीडितेच्या आईने तात्काळ कर्जत पोलीस ठाणे गाठून पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्परतेने तपास चक्रे फिरवली. गुन्हा घडल्यापासून आरोपी हा दोन दिवस पोलिसांना गुंगारा देत फरार होता. मात्र, कर्जत पोलिसांनी गुप्त माहिती आणि तांत्रिक तपासाच्या आधारे सापळा रचून काल रात्री अखेर या नराधम बापाच्या मुसक्या आवळल्या.
आरोपीला ठोकल्या बेड्या
पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या घटनेमुळे संपूर्ण कर्जत परिसरातून तीव्र संताप आणि निषेध व्यक्त होत असून, अशा विकृत मानसिकतेच्या नराधम बापाला कायद्याने कठोरत कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.




