शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेतच घालवावी लागली रात्र तर दुसरीकडे काही कालावधीने टळली दुर्घटना
जव्हार / नवप्रहार मीडिया नेटवर्क
एकीकडे राज्यात बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे सगळीकडे पूरपरिस्थिती उद्भवली आहे. हवामान खात्याने अनेक जिल्यात रेड, यलो अलर्ट घोषित केला आहे.त्यामुळे अनेक शाळांनी सुटी जाहीर केली आहे. पण पालघर जिल्ह्यातील जव्हार येथील शाळेला सुटी नसल्याने मुलं शाळेत गेली होती. जव्हार तालुक्यात हेदीचापाडा येथील नदीला आलेल्या पुराने पूलच वाहून गेला. त्यामुळे हेदीचापाडा येथील जिल्हा परिषद शाळेतील ५८ विद्यार्थ्यांना रात्री शाळेतच मुक्काम करण्याची वेळ आली.
पावसाने पूल वाहून गेल्याने विद्यार्थ्यांना शाळेतच थांबावे लागले. गुरुवारी विद्यार्थ्यांना घरी जाता न आल्याने पर्यायी म्हणून शालेय शिक्षण समिती व शिक्षकांनी मुलांना रात्रीचे जेवण देऊन शाळेतच झोपण्याची व्यवस्था करून दिली. शिक्षकही शाळेतच थांबले होते. शुक्रवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यावर वाहून गेलेल्या पुलाच्या मार्गावरून नदीमधून मुलांना घरी सोडण्यात आले. रस्ता पूर्ववत होत नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत येण्यासाठी नदीतून धोकादायकपणे प्रवास करावा लागणार आहे.
जव्हार तालुक्यातील शिरोशी तळ्याचापाडा पुलावरून पाणी जात असल्यामुळे ३० ते ४० विद्यार्थी व शेतकरी गुरुवारी दुपारपासून अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून प्रतिसाद न मिळाल्याने पालकांनी जीव धोक्यात टाकून मुलांना खांद्यावरून नदी पार करून घरी आणले. जिल्ह्यात अनेक ठिकाणी नदी, नाले ओसंडून वाहत आहेत. अनेक पुलांवरून पाणी वाहत आहे. त्यामुळे अनेक पाड्यांचा संपर्क तुटला होता.
जव्हार येथील विद्यार्थ्यांना पूल वाहून गेल्याने रात्र शाळेतच काढावी लागली तर वर्धा येथील न्यू इंग्लिश हायस्कुल चे विद्यार्थी काही कालावधीने बचावले. त्याचे झाले असे की आयुर्विमा महामंडळाच्या वर्धा शाखेच्या मागच्या बाजूने रस्त्यावर उभ्या कारवर आयुर्विमा कार्यालयाच्या परिसरातील झाड कोसळले. त्यामुळे कार झाडा खाली दबली तर कार्यालयाची सुरक्षा भींतही पडली.
याच परिसरात न्यू इंग्लिश हायस्कूल आहे. त्याच मार्गावरून अनेक विद्यार्थी आणि त्यांची वाहनं जातात. ती वेळ टळल्याने मोठी दुर्लाटना टळली. ही घटना आज 28 रोेजी सायंकाळी 4.15 वाजताच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, आज आयुर्विमा महामंडळाच्या वर्धा शाखेत अभिकर्ता लोकांची बैठक होती. त्यासाठी पुलगाव येथील कल्पना राजेंद्र लोणकर आल्या होत्या. कार्यालय परिसरात जागा अपुरी असल्याने त्यांनी 3 वाजताच्या सुमारास आपली एम.एच. 02 सीएल 8264 क्रमांकाची कार न्यू इंग्लिश हायस्कूलकडून जेलरोडकडे जाणार्या रस्त्यावर उभी केली. काही वेळातच त्यांच्या कारवर कार्यालय परिसरात असलेले झाड उन्मळून पडले. यात कार्यालयाची सुरक्षा भींतही कोसळली. हेे झाड विजेच्या तारांवर पडल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. याच मार्गावर न्यू इंग्लिश हायस्कूल असुन या मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. सुदैैवाने झाड उन्मळून पडले त्यावेळी रस्त्यावर कोणीही नव्हते. शाळा सुटायलाही अवकाश होता. आयुर्विमा कार्यालयाच्या मागील बाजूला असलेल्या परिसरातील झाड तोडण्याची परवानगी मागण्यासाठी नगर पालिकेकडे निवेदनं देण्यात आली, असल्याचे आयुर्विमा महामंडळाच्या अधिकार्यांनी सांगितले.