स्वयंभू भोंदूबाबा कडून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण


हे घ्या आणखी एक भोंदूबाबा ……..
पुणे / विशेष प्रतिनिधी
भोंदूबाबा कडून महिला तरुणींचे लैंगिक शोषण ही नित्याची बाब झाली आहे. एकीकडे देशात साक्षरतेचे प्रमाण वाढत असताना अंधश्रद्धेचे प्रमाण देखील जोमाने वाढत असल्याचे आढळून येत आहे. कारण भोंदूबाबाच्या कचाट्यात सापडणारे अशिक्षित आणि शिक्षितच नव्हे तर उच्चशिक्षित देखील आहेत. आणि याच कारणामुळे महिलां आणि तरुणींच्या लैंगिक शोषणात वाढ झाली आहे. भोंदूबाबा कडून लैंगिक शोषणाची घटना पुण्यातून समोर येत आहे.
याप्रकरणी त्याच्यावर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा स्वयंघोषित गुरुवर्य सध्या फरार आहे. या घटनेने संपूर्ण पुण्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पुण्यातील बिबवेवाडी परिसरात राहणारा आरोपी स्वप्निल लांडे हा अंधश्रद्धा, भीती आणि चमत्कारांच्या नावाखाली लोकांचा विश्वास संपादन करत असे. याच विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने हे संतापजनक कृत्य केले आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या नराधमाने एका अल्पवयीन मुलीला स्वतःच्या मांडीवर बसवून तिच्या कानात मंत्र फुंकल्याचा बनाव केला. ”तुला कसलीही अडचण किंवा संकट आले तर थेट माझ्याकडे ये,” असे खोटे आमिष दाखवत त्याने या निरागस चिमुकलीच्या अंधश्रद्धेचा गैरफायदा घेऊन तिचे लैंगिक शोषण केले.
पीडितेचे समुपदेशन; आरोपीचा शोध सुरू
या धक्कादायक प्रकारानंतर पीडित मुलीला मानसिक धक्का बसला असून, सध्या तज्ज्ञांकडून तिचे समुपदेशन केले जात आहे. बिबवेवाडी परिसरातील एका व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, पोलिसांत गुन्हा
दाखल झाल्याची कुणकुण लागताच आरोपी स्वप्निल लांडे फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पुणे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आहेत. या फरार भोंदूबाबाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.
पालकांना सतर्क राहण्याचे आवाहन
श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या या किळसवाण्या भोंदूगिरीमुळे समाजातील अंधश्रद्धेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. चमत्कार आणि दैवी शक्तीच्या भूलथापांना बळी पडून निरागस बालकांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये, यासाठी पालकांनी अधिक सतर्क राहण्याची अत्यंत आवश्यकता आहे.




