भावनिक आधार देत साधली जवळीक, त्यानंतर बलात्कार आणि धर्मपरिवर्तनाचा दबाब

व्हिडिओ काढून केले ब्लॅकमेल, 17 लाख उकळले
मित्रासोबत सबंध ठेवण्यासाठी दबाब
सांगली / विशेष प्रतिनिधी
भावनिक आधाराच्या बहाण्याने जवळीक साधत महिलेवर बलात्कार , व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणे आणि 17 लाख उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.इतकेच नाही तर त्या महिलेवर धर्म परिवर्तनासाठी दबाब तसेच मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी देखील दबाब टाकण्यात आल्याचे महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
सांगलीतील कोकळे गावचा रहिवासी इम्रान अब्बास पखाली (वय 29) याने एका महिलेवर तब्बल दोन वर्षांपासून बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाली आहे. आरोपीने पीडित महिलेचे अश्लील व्हिडिओ तयार करून तिला ब्लॅकमेल केले आणि सुमारे 17 लाख रुपये उकळले. याशिवाय महिलेवर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात असल्याचाही आरोप पीडितेने केला आहे.
शारीरिक संबंधांसाठी दबाव
धर्मांतरास विरोध केल्यामुळे आरोपीने पीडितेला बेदम मारहाण करून तिचा हात फ्रॅक्चर केला. त्यानंतरही अत्याचार थांबले नाहीत. आरोपी इम्रान पखाली याने त्याचा मित्र आणि नातेवाईक मोहसीन मुलानी (वय 32) याला पीडितेचा नंबर दिला आणि तिच्यावर त्याच्याशीही शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकला. या मागणीस नकार दिल्यानंतर आरोपींनी पीडितेचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो तिच्या पतीसह मुले आणि नातेवाईकांना पाठवून तिची समाजात नाहक बदनामी केली.
पोलिसांनी काय सांगितले?
याप्रकरणी पीडित महिलेने सांगली शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान पखाली आणि त्याचा मित्र मोहसीन मुलानी यांच्यावर बलात्कार, फसवणूक, शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. इम्रान पखाली याला ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने त्याला 3 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे. पीडित महिलेने या प्रकरणातील आरोपीला फाशीचीच शिक्षा देण्याची आक्रमक मागणी केली आहे.
महिला नगरसेविकेचाही सहभाग?
दरम्यान, श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले यांनी पत्रकार परिषदेत पेन ड्राईव्हद्वारे पुरावे सादर करत आरोपीच्या मोबाईलमध्ये सुमारे 20 इतर महिलांचे नग्नावस्थेतील फोटो आणि व्हिडिओ असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. या संपूर्ण गुन्ह्यात सांगलीतील एका महिला नगरसेविकेचाही सहभाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला असून आरोपींना कठोर शिक्षेची मागणी केली आहे. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.




