इकडे बाप्पांची मिरवणूक तर दुसरीकडे चोरट्यांचा धुमाकूळ

ज्वेलर्स चे दुकान फोडून जबरी चोरी, शेजारच्या दुकानातून सुरुंग लावून केला प्रवेश
नवी मुंबई / विशेष प्रतिनिधी
काल पासून सगळीकडे बाप्पांच्या विसर्जनाची धामधूम सुरू झाली आहे. ढोलताशांच्या आवाजाचा फायदा घेत चोरट्यांनी ज्वेलर्स च्या दुकानात चोरी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे ज्वेलर्स च्या बाजूच्या दुकानाची भिंत फोडून चोरट्यांनी ज्वेलर्स मध्ये प्रवेश केला.
शेजारील गाळ्यातून ज्वेलर्सच्या दुकानाच्या भिंतीला ड्रिल मशीन आणि हातोड्याच्या साहाय्याने भगदाड पाडून चोरट्यांनी दुकानात प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. सोन्याचे दागिने ठेवलेली तिजोरी उघडण्याचा प्रयत्न करताना अलार्म वाजल्याने चोरट्यांनी तिजोरी न उघडताच तेथून पळ काढला.
ज्वेलर्सच्या शेजारील गाळा अवघ्या २२ दिवसांपूर्वी फळविक्रीच्या व्यवसायासाठी भाड्याने घेण्यात आला होता. या गाळ्यातूनच ज्वेलर्सच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडण्यात आले. गणेशमूर्ती विसर्जनामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात ढोल-ताशांचा आवाज सुरू होता. त्यामुळे भिंत फोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या ड्रिल मशीन आणि हातोड्याचा आवाज मिरवणुकीच्या गोंगाटात मिसळला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
भगदाड पाडल्यानंतर चोरट्यांनी ज्वेलर्सच्या दुकानात प्रवेश केला. दुकानातील चांदीचे दागिने आणि काही रोकड घेऊन त्यांनी तेथून पोबारा केला. त्यानंतर सोन्याचे दागिने ठेवलेल्या तिजोरीकडे चोरट्यांनी मोर्चा वळवला. तिजोरी उघडण्याचा प्रयत्न करताच अलार्म वाजला. त्यामुळे चोरट्यांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न सोडून दिला. अलार्म वाजल्यामुळे सोन्याच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणात चोरी होण्याचा प्रकार टळल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची माहिती मिळताच एपीएमसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे ताब्यात घेतले आहेत. दुकान तसेच परिसरातील सीसीटीव्ही चित्रण तपासण्याचे काम सुरू असून, चोरट्यांच्या हालचालींचा मागोवा घेण्यात येत आहे.
२२ दिवसांपूर्वी गाळा घेणारा फळविक्रेता गायब
दरम्यान, ज्वेलर्सच्या शेजारील गाळा २२ दिवसांपूर्वी भाड्याने घेणारा फळविक्रेता सध्या गायब असल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे या चोरीच्या घटनेत त्याची काही भूमिका आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. गाळा भाड्याने देताना संबंधित व्यक्तीची ओळख आणि कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली होती का, याचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.
गाळा भाड्याने घेणाऱ्या व्यक्तीने ओळखपत्र, कायमस्वरूपी पत्ता आणि अन्य आवश्यक कागदपत्रे दिली होती का, तसेच गाळ्यात नेमका कोणता व्यवसाय सुरू करण्यात आला होता, याचीही चौकशी सुरू आहे. चोरीच्या घटनेपूर्वी या गाळ्यातून ज्वेलर्सच्या दुकानाची पाहणी करण्यात आली होती का, याचाही तपास केला जात आहे.
झारखंडमधील टोळीचा सहभाग तपासणार
चोरीची पद्धत आणि भिंतीला भगदाड पाडून दुकानात प्रवेश करण्याच्या प्रकारावरून बाहेरील टोळीचा सहभाग आहे का, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. झारखंडमधून आलेल्या टोळीचा या चोरीत सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतरच याबाबत स्पष्टता होणार आहे.
एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी सुरू असलेल्या ढोल-ताशांच्या गजराचा फायदा घेत भिंतीला भगदाड पाडण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनास्थळावरील पुरावे आणि सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे तपास सुरू असून, गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.




