अपघात
भीषण अपघात एकाच कुटुंबातील १३ जण ठार

नोकरी लागल्याच्या आनंदात देवदर्शनाला निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला
रामगड / विशेष प्रतिनिधी
सुनेला शाळेवर शिक्षिकेची नोकरी लागली. कुटुंब त्या नोकरीचा आनंद साजरा करण्यासाठी देवदर्शनाला गेले.पण त्याच्या वाहनाला अपघात झाल्याने एकाच कुटुंबातले १३ जण दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
कुटुंबातील सुनेला सरकारी शाळेत शिक्षिका पदावर नोकरी लागली होती. हाच आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब रजरप्पा मंदिरात दर्शनाला आणि पूजेसाठी निघाले होते. मात्र, आनंद साजरा करायला निघालेल्या या कुटुंबाचा प्रवास शोककळेत बदलला. झारखंडमधील रामगड येथे राष्ट्रीय महामार्ग-३३ वर त्यांच्या स्कॉर्पियो गाडीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चार मुले, चार महिला आणि पाच पुरुष असे एकूण १३ जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व जण बिहारच्या नालंदा जिल्ह्यातील बेन पोलीस ठाणे हद्दीतील जंघरों गावचे रहिवासी होते. विवेक कुमार यांच्या पत्नीची सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून निवड झाली होती. याच आनंदात कुटुंबीय रजरप्पा मंदिरात पूजेसाठी जात होते. विवेक कुमार स्वतः एक खासगी शाळा चालवतात. चालकाव्यतिरिक्त स्कॉर्पियोमध्ये बसलेले सर्व जण एकाच कुटुंबातील होते.
पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल
अपघाताची माहिती मिळताच कुज्जू ओपी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सर्व जखमी आणि मृतांना रामगड सदर रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे डॉक्टरांनी १३ जणांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच रामगडचे पोलीस अधीक्षक यांच्यासह अनेक प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली आणि आवश्यक सूचना दिल्या. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
