प्रागतिक विद्यालयात भारतीय मानक ब्युरोचा उपक्रम संपन्न
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी:- तालुक्यातील प्रागतिक विद्यालय जळगाव येथे दि. 1 आॅगष्टला भारतीय मानक ब्युरो , शाखा नागपुर आयोजित स्टँडर्ड रायटिंग स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत विद्यालयातील स्टँडर्ड क्लबमधे समाविष्ट असलेल्या 17 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला..
प्रत्येक वस्तूंना शासनाने ठरवुन दिलेली काही मानके असतात. ही मानके ठरविण्यासाठी भारतीय मानक ब्युरोची स्थापना शासनाने केलेली असते. विद्यार्थ्यांना ही मानके समजावी ISI मार्क असलेल्या वस्तूंची मागणी वाढावी यासाठी भारतीय मानक ब्युरो शाखा नागपुर यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. याच शाखेद्वारे दि. 14 व 15 फेब्रुवारी 2023 ला जिल्ह्यातील नामांकीत शाळेच्या एका टेक्नोसेव्ही शिक्षकांचे प्रशिक्षण होटल अशोक, नागपूर येथे आयोजित केले होते. त्यानंतर प्रशिक्षणातील प्रत्येक शिक्षकांनी आपापल्या शाळेत स्टँडर्ड क्लबची स्थापना करुन इयत्ता 9 वी व 10 वीच्या इच्छुक विद्यार्थ्यांना या क्लबमधे समाविष्ट केलेले होते. त्याअनुषंगाने ही स्पर्धा आयोजित झालेली होती.
ही स्पर्धा श्री. रोटकर सर, शिक्षक न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय वर्धा तसेच भारतीय मानक ब्युरो द्वारा आयोजित स्पर्धेचे जिल्हा समन्वयक यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. श्री. रोटकर सरांनी भारतीय मानक ब्युरोचे कार्य, वस्तूंची मानके काय असतात ती कशी ठरवली जातात तसेच ती आवश्यक असतात याबद्दल विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण श्री. रोटकर सर तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. भुते सर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. सहभागी विद्यार्थ्यांना भारतीय मानक ब्युरो द्वारा प्रमाणपत्र, स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षीसे व एक-एक भेटवस्तू देण्यात आली. व त्यांचा गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आनंदाने व उत्स्फुर्तपणे सहभाग घेऊन वस्तूंची मानके कशी लिहली जातात याबाबत अनुभव घेतला.
स्पर्धेचे संपुर्ण आयोजन, संचालन व आभार प्रकटन शाळेचे सहा.शिक्षक तसेच भारतीय मानक ब्युरो द्वारा संचालित स्टँडर्ड क्लबचे मेन्टर श्री.अनिकेत भुसारी यांनी केले.
कार्यक्रमाची सांगता सर्व विद्यार्थ्यांना अल्पोपहार देऊन करण्यात आली.