क्राइम
त्या शिक्षक आत्महत्या प्रकरणात खळबळजनक बाब उघड


नांदेड / विशेष प्रतिनिधी
जिल्ह्यातील हिमायत नगर तालुक्यातील पोटा येथील शाळेत विद्यादान करणाऱ्या सुनील मोरे (42 ) यांनी 16 जुलै रोजी आपल्या दोन मुलांसह गाडी नदीत घालून आत्महत्या केली होती. पण शवविच्छेदन अहवालातून एक खळबळजनक बाब समोर आली आहे. आत्महत्येपूर्वीच या शिक्षकाने आपल्या दोन मुलांची हत्या केल्याचे समोर आले आहे.
नांदेड-मूदखेड मार्गावरील आमदूरा पुलावरून भरधाव वेगाने त्याने गोदावरी नदीत गाडी घातली होती. मोरे यांच्या कारमध्ये त्याची 14 वर्षीय मुलगी सारा आणि 10 वर्षीय मुलगा सुमेध हे दोघे पण होते.
आत्महत्येआधी स्टेट्स आणि मित्रांना पाठवला मेसेज
गट शिक्षणाधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी शिक्षक दत्ता पवळे यांच्या त्रासाला कंटाळून मुलांसह आत्महत्या करत असल्याच स्टेटस त्याने व्हाट्सअपवर ठेवलं होतं. शिवाय तसा एक मेसेज देखील मयत सुनील मोरे याने मित्रांच्या ग्रुपवर टाकला होता. सुनील मोरे याच्या मृत्यू प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी चार जणांवर अॅट्रॉसिटी आणि मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल केला होता.
दोन्ही मुलांची आधीच केली होती हत्या
दरम्यान, आपल्या दोन्ही मुलांसह त्याने गाडी नदीत घातली असं प्रथमदर्शनी वाटत होतं. मात्र, या निर्दयी पित्याने गाडी नदीत घालण्यापूर्वीच आपल्या दोन्ही मुलांची हत्या केली असल्याचं आता शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे. चाकूने मुलगी सारा आणि मुलगा सुमेध यांच्या छातीवर आणि पोटात वार करून त्यांची आधी हत्या केली होती. केली होती. त्यानंतर नंतर दोन्ही मुलांच्या मृतदेहासह कार नदीत घालून आपलंही जीवन संपवलं.
तिघांचे मृतदेह काढून शुकवारी शवविच्छेदन करण्यात आले. आज पोलिसाना शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाला. त्यात दोन्ही मुलांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झालं. तेव्हा पोलिसांनी स्वतः फिर्याद देऊन मयत सुनील मोरे याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.




