हटके
पत्नीची विहिरीत उडी, नवऱ्याची बाहेर येण्यासाठी शरणागती

भोपाळ / विशेष प्रतिनिधी
नवरा बायकोत वाद हा काही नवीन विषय नाही. त्यांच्यात सकाळी भांडण होतात आणि रात्री पुन्हा ते एकाचे एक होतात.पण काही वेळा हा वाद विकोपाला जातो.आणि मग दोघांपैकी कोणीतरी टोकाचे पाऊल उचलतो. यात सुखी संसाराची राखरांगोळी होते.
मध्य प्रदेशच्या शिवपुरी जिल्ह्यातून अशीच एक कौटुंबिक घटना समोर आली आहे.
शिवपुरी जिल्ह्यातील दिनारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सहरिया गावात पती-पत्नी यांच्यात वाद झाला. त्यानंतर पत्नीनं विहिरीत उडी घेतली. पत्नीला विहिरीकडे जाताना पाहून पतीही तिच्या मागे धावला. तिला विहिरीतून बाहेर काढण्यासाठी दोरी टाकली. महिलेनं दोरी पकडली. पण बाहेर येण्यास नकार दिला.
महिलेनं विहिरीत उडी मारल्याची बातमी गावात पसरली. यानंतर विहिरीजवळ तोबा गर्दी जमली. महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी विहिरीत दोरीच्या मदतीनं खाट टाकण्याची व्यवस्था केली गेली. पण तरीही महिलेनं बाहेर येण्यास नकार दिला. विहिरीतून बाहेर येण्यासाठी महिलेनं पती समोर एक अट ठेवली. पतीनं ग्रामस्थांसमोर आपली माफी मागावी. तरच आपण बाहेर येऊ, असं म्हणत महिला अडून बसली.
ग्रामस्थांनी महिलेला समजवण्याचा प्रयत्न केला. पण ती काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. अखेर पतीनं ग्रामस्थांच्या समोर तिची माफी मागितली. यानंतर महिला बाहेर येण्यास तयार झाली. हा सगळा घटनाक्रम सुरू असताना ग्रामस्थांच्या नजरा विहिरीवर खिळल्या होत्या.
महिला विहिरीतून बाहेर येताच तिनं विहिरीत उडी मारण्यामागचं कारण समोर आलं. पती घरातून बाहेर जाताना दाराला कुलूप लावायचा. त्यामुळेच महिला नाराज झाली. यावरून वाद वाढल्यानंतर महिलेनं विहिरीत उडी मारल्याचं दिनारा पोलीस ठाण्याचे प्रभारी सुधीर कुशवाहा यांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांना अद्याप तरी कोणतीही तक्रार मिळालेली नाही. तक्रा र मिळाल्यास नियमानुसार कारवाई करू, असं पोलिसांनी सांगितलं.