शैक्षणिक

आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांनी घेतले ताब्यात

Spread the love

मुंबई / विशेष प्रतिनिधी 

             आदिवासी आश्रमशाळांना शिजवलेले अन्न मध्यवर्ती स्वयंपाकघरातून ( सेंट्रल किचन) पुरवले जाते. १०० किमी दूरवरून अन्न येत असल्याने विद्यार्थ्यांना सारख्या विषबाधा होत असून सेंट्रल किचनची पद्धत बंद करण्यात यावी. आदिवासी आयुक्त लिना बनसोड आणि विभागाचे सचिव विजय वाघमारे यांच्या बदल्या करण्यात याव्यात. गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आदिवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने मृत्यू झालेल्या तीन विद्यार्थ्यांच्या पालकांना भरपाई द्यावी, या मागण्यांसाठी मुंबईला आलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे.

 

विविध मागणीसाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी नाशिकहून १७० किमी पायी ‘उलगुलान लाँग मार्च’ करत आलेल्या ५०० आदिवासी महाविद्यालयीन युवक-युवतींना मुंबई पोलिसांनी रविवारी मध्यरात्री काँग्रेसच्या प्रदेश आणि मुंबई कार्यालयात घुसून ताब्यात घेतले.

या कारवाईचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.

गेली ४८ दिवस आदिवासी विद्यार्थी नाशिक येथील ईदगाह मैदानावर ठिय्या आंदोलन करत होते. मात्र मागण्या मान्य न झाल्याने त्यांनी मुंबईत लोकभवनवर मोर्चा नेण्याचा निर्णय घेतला. २८ सप्टेंबर रोजी या विद्यार्थ्यांनी नाशिकहून लाँग मार्च सुरू केला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा झाल्यानंतर त्यातील विद्यार्थ्यांच्या एका गटाने मार्चला पूर्णविराम देत नाशिकला परत जाण्याचा निर्णय घेतला.

३५० विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मात्र मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम राहिले. रविवारी रात्री ते मुंबईत पोचले. मात्र आझाद मैदानावर आंदोलनाला त्यांना परवानगी मिळाली नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी आझाद मैदानातील काँग्रेसच्या मुंबई कार्यालयात आणि परळ येथील टिळक भवन या प्रदेश कार्यालयात आसरा घेतला.

काँग्रेसच्या मुंबई कार्यालयात मध्यरात्री आझाद मैदान पोलिसांनी घुसून दोनशे विद्यार्थी-विद्यार्थिनींना ताब्यात घेतले. पहाटे परळ येथील प्रदेश कार्यालयात घुसून दोनशे विद्यार्थी-विद्यार्थिनींना ताब्यात घेण्यात आले. गेले आठ दिवस दररोज २० किमी पायपीट केलेल्या या विद्यार्थ्यांना पोलीस रात्रभर दादर, यलोगेट, आझाद मैदान, चुनाभट्टी, विक्रोळी, कोपरी अशा विविध पोलीस स्टेशनमध्ये अन्नपाण्याविना फिरवत राहिले. या प्रवासात सात ठिकाणी बस बदलण्यात आल्या. विद्यार्थिनींची या फिरस्तीमध्ये मोठी कुचंबणा झाली. नवी मुंबई आणि दादरमध्ये आंदोलनासाठी आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांना रात्री अटक करण्यात आली.

आम्ही ‘लोकभवन’ला वेढा घालणार नव्हतो. आझाद मैदान पोलीस स्टेशनला आंदोलनासाठी रितसर पत्र दिलेले आहे. मात्र आम्हाला परवानगी नाकारण्यात आली, असे सागर पावरा या विद्यार्थी नेत्याने सांगितले. बहुतांश युवक हे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील आदिवासी विभागाच्या वसतीगृह व शाळांमध्ये शिकणारे आहेत. काँग्रेसने आम्हाला येथे राहण्याची मुभा दिली असून मागण्या मान्य झाल्याशिवाय गावी जाणार नाही, असे या विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

काँग्रेसचा काय संबंध ?

नाशिक येथे मागच्या आठवड्यात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पक्षाच्या शिबीराला आले होते. तेव्हा या आदिवासी विद्यार्थ्यांनी राहुल यांची भेट घेतली होती. राहुल यांनी काँग्रेसच्या नेत्यांना या विद्यार्थी आंदोलनास मदत करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या आंदोलनाला काँग्रेसच्या ‘एनयुएसआय’कडून मार्गदर्शन व मदत केली जात आहे. परळ आणि आझाद मैदान येथील काँग्रेसच्या दोन्ही कार्यालय परिसरात सोमवारी पोलीस छावणीचे स्वरूप होते.

राहुल यांचा पाठिंबा

हर्षवर्धन सपकाळ रात्री नागपूरहून आल्यानंतर त्यांनी टिळक भवनला भेट दिली. तेथे लावण्यात आलेला पोलीस बंदोबस्त हटवण्याची त्यांनी मागणी केली. काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य नसीम खान यांनी दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली असून प्रदेश कार्यालयात बेकायदेशीर घुसून कारवाई करणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची त्यांनी मागणी केली आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी यासंदर्भात एक्स माध्यमावर ‘काँग्रेस विद्यार्थ्यांबरोबर असून एक इंचही मागे हटणार नाही’ असे बजावले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close