राज्य

जरांगे पाटलांचे उपोषण सोडविणाऱ्या ललिता तारख पोलिसात

Spread the love

वडीगोद्री (जि. जालना): मराठा आरक्षण आंदोलनात सुरुवातीपासून आघाडीवर राहिलेल्या आणि मनोज जरांगे पाटील यांचे चौथे उपोषण सोडवणाऱ्या अंतरवाली सराटी येथील आंदोलक ललिता शामसुंदर तारख यांनी आपल्याला सोशल मीडियावरून अत्यंत गलिच्छ भाषेत ट्रोल केले जात असून, फोनवरून कुटुंबासह जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याची खळबळजनक तक्रार दाखल केली आहे.

एवढेच नव्हे तर आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या (AI) माध्यमातून चेहरा मॉर्फ करून अश्लील फोटो व व्हिडिओ तयार करून समाजमाध्यमांवर व्हायरल केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी सोमवार, २८ सप्टेंबर २०२६ रोजी अंबड पोलीस ठाण्यात लेखी अर्ज सादर करून कायदेशीर कारवाईची आणि पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.

 

“तीन वर्षे लढा दिला, पण पदरात काहीच नाही” ललिता तारख यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, त्या मूळच्या अंतरवाली सराटी गावच्या रहिवासी असून सध्या अंबड येथील मोरया रेसिडेन्सीमध्ये वास्तव्यास आहेत. कुटुंबाच्या उपजीविकेसाठी त्या पतीला खानावळ व्यवसायात मदत करतात. मुलांच्या भवितव्याचा विचार करून त्या गेल्या तीन वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलनात सक्रिय राहिल्या. २ सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅझेट लागू करून कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी अध्यादेश जारी झाल्यानंतरही अर्ज करून तब्बल १० महिने उलटले, तरी आपल्याला प्रमाणपत्र मिळाले नाही. दुसरीकडे आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी आरक्षणाचा प्रश्न मार्गी न लागताच उपोषण मागे घेतल्याने फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली, अशी व्यथा त्यांनी २६ सप्टेंबर रोजी माध्यमांसमोर मांडली होती.

AI चे अश्लील व्हिडिओ अन् मुलाला संपवण्याची धमकी माध्यमांसमोर आपली खदखद व्यक्त केल्यानंतर लगेचच समाजकंटकांकडून त्यांच्यावर सायबर हल्ले सुरू झाले. तक्रारीत त्यांनी नमूद केले आहे की, त्यांच्या चेहऱ्याचा गैरवापर करून ‘एआय’च्या (AI) साहाय्याने अश्लील छायाचित्रे आणि बनावट व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यात आले. अज्ञात क्रमांकांवरून फोन करून शिवीगाळ केली जात असून ललिता तारख यांच्यासह त्यांचे पती आणि मुलाला थेट जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. या सायबर दहशतीमुळे संपूर्ण कुटुंब प्रचंड मानसिक तणावाखाली आले असून घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.

‘२०२३ पासूनच्या संपत्तीची चौकशी करा’; ललिता तारख यांचे आव्हान सोशल मीडियावरून त्यांच्यावर आर्थिक लाभाचे आरोप करणाऱ्यांना ललिता तारख यांनी थेट आव्हान दिले आहे: “माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी २०२३ पासून माझ्यासह आंदोलन संबंधित सर्व व्यक्तींच्या स्थावर व जंगम मालमत्तांची, बँक खात्यांची आणि उत्पन्नाच्या स्रोतांची खुली चौकशी करावी. चौकशीत जर माझ्यावर करण्यात आलेले आरोप सिद्ध झाले तर माझ्यावर खुशाल कारवाई करा; मात्र आरोप करणाऱ्यांचीही सखोल तपासणी झाली पाहिजे.”

पुरावे पोलिसांच्या स्वाधीन; कारवाईची मागणी ललिता तारख यांनी अंबड पोलिसांकडे दिलेल्या तक्रार अर्जासोबत सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट्स, बदनामी करणाऱ्या बनावट प्रोफाईल्सचे स्क्रीनशॉट्स आणि धमकीच्या ऑडिओ कॉल्सचे पुरावे जोडले आहेत. अंबड पोलीस आता या प्रकरणात सायबर सेलच्या मदतीने संशयित अकाउंट्सचा शोध घेत असून पुढील कारवाई काय होते, याकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close