बापरे…. जमिनीपासून ६० फूट उंचीवर घरे बांधून राहते ही आदिवासी जमात

जकार्ता / नवप्रहार डेस्क
आदिवासी लोकांची जीवनशैली काही वेगळीच असते.प्रत्येक देशाच्या आदिवासी समाजाचे राहणीमान आणि खानपान वेगळे असते. इंडोनेशिया येथील आदिवासी लोकांची कोरोवाई ही जमात ही आपल्या अनोख्या जीवन पद्धतीसाठी ओळखली जाते. ही जमात जमिनीवर राहण्यापेक्षा झाडावर आणि ती ही जमिनीपासून १५ ते २० मीटर म्हणजेच जवळपास ५० ते ६० फूट उंचीवर आपली घरे उभारतात.
जंगलात सहज उपलब्ध होणारे लाकूड, वेली आणि पानांचा वापर करून ही घरे तयार केली जातात.
कोरोवाई लोकांचे दैनंदिन जीवन जंगलातील नैसर्गिक साधनांशी घट्ट जोडलेले आहे. शिकार, फळे, कंदमुळे आणि जंगलातून मिळणाऱ्या अन्य वस्तूंवर त्यांची उपजीविका अवलंबून असते. झाडांवर घर बांधण्यामागे जंगली प्राणी आणि इतर संभाव्य धोक्यांपासून बचाव, तसेच जंगलातील काही खाद्यस्रोत सहज मिळणे, अशी विविध कारणे सांगितली जातात. या उंच घरांची उभारणी करणे हे कोरोवाई समुदायाच्या पारंपरिक कौशल्याचा भाग आहे. झाडांची निवड करण्यापासून घराचा सांगाडा उभारणे आणि त्यावर छप्पर घालण्यापर्यंतची कामे जंगलातील उपलब्ध साहित्याच्या मदतीने केली जातात. त्यामुळे ही घरे केवळ निवारा नसून त्यांच्या पर्यावरणाशी जुळवून घेतलेल्या जीवनशैलीचे प्रतीक मानली जातात.
झाडांवर राहण्याचे मुख्य कारण काय?
कोरोवाई लोकांच्या झाडांवर राहण्यामागे काही विशिष्ट कारणे आणि श्रद्धा आहेत. विषारी साप आणि इतर हिंसक जंगली प्राण्यांच्या हल्ल्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी हे लोक झाडांवर घरे बनवतात. या लोकांचा असा ठाम विश्वास आहे की, भूत-खेता आणि दुष्ट आत्मा जमिनीवर निवास करतात. या दुष्ट शक्तींपासून स्वतःला वाचवण्यासाठी ते उंचावर राहणे पसंत करतात. याच अंधश्रद्धेमुळे त्यांच्यामध्ये काही प्रमाणात आजही नरभक्षक परंपरांचे अंश पाहायला मिळतात. झाडांवर राहिल्यामुळे त्यांना जंगलात फळे आणि लहान प्राणी शोधणे अधिक सोपे जाते. निसर्गाच्या सान्निध्यात आणि कोसो दूर राहणाऱ्या या कोरोवाई जनजातीची ही जीवनशैली संपूर्ण जगाचे नेहमीच लक्ष वेधून घेते.


